मुंबई, 27 आॅगस्ट : बेस्ट कार्यालयात सत्यनारायण पुजेवेळी अभिनेत्री माधवी जुवेकरसह नागीन डान्स करणाऱ्यांना कारवाईचा डंख लागलाय. माधवी जुवेकर आणि इतर 7 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. तर 5 जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस करण्यात आलीये.
वडाळा आगारात या कर्मचाऱ्यांनी पैशांची उधळण करत नागिन डान्स केला होता,ज्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. याविरोधात माधवी जुवेकरसह 13 जण बेस्टकडे दाद मागणार आहेत. दरम्यान बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी ही शिक्षा टोकाची असल्याची भूमिका मांडलीये.
काय आहे प्रकरण ?
मागील वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी दसऱ्यानिमित्त बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री माधवी जुवेकर हिचा नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात माधवी ही एका महिला कर्मचाऱ्यासोबत नागीन डान्स करत होती. बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही घटना घडली होती. कॉमेडी एक्सप्रेस आणि अनेक नाटकांमध्ये काम केलेली माधवी ही बेस्टमध्ये कामाला आहे.
या कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय. एकीकडे पगार वेळेत मिळत नाही अशी तक्रार बेस्ट कर्मचाऱ्यांकडून केली जात असताना हा व्हिडिओ समोर आल्याने त्याबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्यात.
कर्मचाऱ्यांना नोटीसा
या प्रकरणाची बेस्ट प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्या होत्या. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आली होती. बेस्ट विभागीय अधिकाऱ्याकडून ही नोटीस पाठवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.