‘मुळशी पॅटर्न’मुळे भूतकर मेरिटमध्ये

‘मुळशी पॅटर्न’मुळे भूतकर मेरिटमध्ये

चित्रपटात गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात नाही. संजू चित्रपटासारखं माझी आई लवकर गेली म्हणून ड्रग्ज घ्यायला लागलो अशा धाटणीचे भिकार युक्तिवादही नाहीत.

  • Share this:

अमेय चुंभळे, प्रतिनिधी

“जमीन इकायची नसतो ओ, राखायची असते”, हे वाक्य ज्या ढंगानं अभिनेता ओम भूतकरनं पडद्यावर म्हटलंय, ते लक्षात राहतं. दीर्घ काळानंतर एक मराठी चित्रपच मनाला इतका भिडला, कोरलाच गेला खरंतर. माझ्या लेखी, मुळशी पॅटर्नची तुलना ‘वास्तव’ आणि ‘डोंबिवली फास्ट’शी करता येईल.

वास्तववादी, सामाजिक, विचार करायला भाग पाडणारा, गुन्हेगारी आणि भावनांची गुंतागुंत दाखवणारा... विशेषणं कमी पडतायेत. चित्रपटात गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात नाही. संजू चित्रपटासारखं माझी आई लवकर गेली म्हणून ड्रग्ज घ्यायला लागलो अशा धाटणीचे भिकार युक्तिवादही नाहीत. वास्तवप्रमाणंच, राउल्या (भूतकर) कुख्यात गुंड बनल्यावर त्याला धक्के मारून घराबाहेर काढते. मुलगा आहे म्हणून कुरवाळत नाही.

त्याच सीनमध्ये जेव्हा राउल्या विचारतो, एवढाच मी नको असेन तर माझा फोटो का ठेवला आहे घरात? त्यावर त्याचे वडील (मोहन जोशी) उत्तर देतात, उद्या पोलिसांनी तुला उजवला तर भिंतीवर टांगायला फोटो नको ? खरं सांगतो, मोहन जोशींचा अभिनय अतिशय चांगला झालाय. माझ्या मते, भूतकर आणि जोशी साहेबांचाच चित्रपट आहे हा. इतर सर्व सहाय्यक भूमिकेत.

लेखक प्रवीण तरडेंचं सर्वात मोठं यश हे की राऊल्या हा तुमच्या आमच्यासारखाच सर्वसाधारण वाटतो, हा कायम जिंकणारच, याला कुणीच हात लावू शकत नाही, असं कधीच वाटत नाही. इंग्रजीत ज्याला vulnerable म्हणतात, तसाच तो वाटत राहतो. तो बॉडी बिल्डर नाही, गॉगल २७ वेळा फिरवून लावत नाही. त्यामुळे तो ओळखीचा वाटतो, काही ठिकाणी जवळचा वाटतो.

चित्रपटातलं सरप्राईझ एलिमेंट म्हणजे सविता मालपेकर यांच्या भूमिकेची लांबी आणि त्यांना मिळालेला वाव. या कसलेल्या अभिनेत्रीला ‘काकस्पर्श’चा अपवाद सोडला तर मराठी सृष्टीनं न्याय दिला नाही, असं मला नेहमी वाटतं. पण मुळशी पॅटर्नमधली आई ही खंबीर, विवेकवादी आणि न्याय करणारी. नवरा जिला सोडून गेला, त्या मुलीनं शारिरीक गरज म्हणून परपुरुषाशी संबंध ठेवणं त्या माऊलीला चूक वाटत नाही. राऊल्याच्या सर्व गँगसमोर ती हे बोलून दाखवते. हे लिहायला धाडस लागतं, आणि पडद्यावरर उतरवायला अभिनयात जान. तरडे आणि मालपेकर मॅडम, दोघांमध्येही याची कमी नाही.

भूतकरसोबत जो सर्वात जास्त भाव खातो तो म्हणजे उपेंद्र लिमये. एंट्री कशी असावी, याचं पाठ्यपुस्तक म्हणजे मुळशी पॅटर्नमधली लिमयेंची एंट्री. त्याचं वर्णन मी इथे करणार नाही, तुम्ही ती पहायलाच हवी. लिमयेंचा करडा आवाज, कडक देहबोली, राऊल्याला त्याची जागा दाखवून द्यायचं धाडस...आहाहा ! असं वाटतं, पोलीस असावा तर असा ! अभिनेते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक. त्यांनी स्वतःच्या प्रेमात न पडता, स्वतःची भूमिका ५ ते ७ मिनिटांपर्यतच ठेवली आहे. उगाच कमल हासनसारखं जबरदस्ती आणि स्वतःला कथेवर लादणे हे त्यांनी टाळलं आहे. उल्लेखनीयच.

होय, चित्रपटात काही त्रुटी आहेत. पण त्याहून महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक कलाकृती आणि प्रेक्षकाच्या मध्ये येत नाही, आणि त्याच्या कथेशी तो प्रामाणिक आहे. काहीतरी सिद्ध करण्यासाठी किंवा मला किती सुचतं बघा, असा कश्यपी थाट तरडेंचा नाही. या परिपक्वतेसाठी त्यांचं मनापासून अभिनंदन.

मुळशीतली गुन्हेगारी या सामाजिक प्रश्नाला कुणी स्वच्छ आरसा दाखवला असेल, तर तो तरडे आणि टीमनं. इतके प्रामाणिक सामाजिक चित्रपट फार कमी येतात, त्यामुळे मुळशी पॅटर्न मिस करू नका, गॅरेंटी देतो, ओम भूतकरला तुम्ही पैकीच्या पैकी मार्क द्याल.

First published: November 29, 2018, 11:54 PM IST

ताज्या बातम्या