लखनऊ, 19 जानेवारी: गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेशात निवडणुकीची (UP election) धामधूम सुरू आहे. निवडणुकी आधीच भारतीय जनता पक्षाला (BJP) उत्तर प्रदेशात मोठी गळती लागली आहे. निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी रामराम ठोकत समाजवादी पक्षात (SP) प्रवेश केला आहे. असं असताना समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या सुनेनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश (Aparna yadav enters in BJP) केला आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांना भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं आहे. लखनऊ कँट येथील जागेवरून निराश झाल्याने अपर्णा यांनी समाजवादी पार्टीला रामराम ठोकल्याची माहिती समोर येत आहे.
अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना यादव यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहे. निवडणुकी आधीच यादव घराण्यातील सुनेनं भाजपात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हेही वाचा-UP Opinion Poll: भाजप 235 जागांसह सत्ता राखण्याचा अंदाज
सर्वात आधी देश येतो...
पक्षात प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, "मी भाजपची खूप आभारी आहे. माझ्यासाठी देश नेहमीच प्रथम येतो." पंतप्रधान मोदी याचं कौतुक करताना अपर्णा यादव म्हणाल्या की, मी नेहमीच पंतप्रधानांच्या कामाची प्रशंसक राहिली आहे.' त्यांनी पुढे म्हटलं की, 'मी देशाची सेवा करण्यासाठी जात आहे. भाजपच्या योजना मला खूप प्रभावित करतात. देशासाठी मी जे काही करेन ते पूर्ण क्षमतेनं करेन.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.