VIDEO : धोनीचा मराठी बाणा! म्हणाला,'भाऊ... घेऊन टाक'

VIDEO : धोनीचा मराठी बाणा! म्हणाला,'भाऊ... घेऊन टाक'

धोनीने महाराष्ट्राच्या केदार जाधवला चक्क मराठीतून दिल्या गोलंदाजीच्या टिप्स.

  • Share this:

विलिंग्टन, 4 फेब्रुवारी : आपल्या आजुबाजूला कोणी भाऊ.. घेऊन टाक म्हटलं तर काही वाटणार नाही. पण भारताबाहेर एका आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणी असं मराठीत बोललं तर आश्चर्याचा धक्का बसेल. क्षणभर आपण आपल्या इथंच आहे की काय वाटेल. झारखंडचा असलेल्या महेंद्रसिंग धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चक्क मराठीतून केदार जाधवला गोलंदाजीच्या सूचना दिल्या.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी मैदानावर अनेकांना काही ना काही सल्ले देत असतो. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना तो नेहमीच मार्गदर्शन करत असतो. कर्णधार नसला तरी यष्टीमागे उभा राहून आजही धोनी सगळी सुत्रं हलवतो म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने महाराष्ट्राच्या केदार जाधवला चक्क मराठीतून गोलंदाजीच्या टिप्स दिल्या. त्याचे मराठी धडे स्टंपला लावलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झालेत. त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गोलंदाजी करताना केदार जाधवने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद केलं. त्यानंतर न्यूझीलंडची धावगती कमी करण्यात केदार जाधवने महत्त्वाची भूमिका बजावली. याच सामन्यात केदारला धोनीने फुल पिच चेंडू न टाकण्याचा सल्ला देताना पुढे नको भाऊ... घेऊन टाक असं चक्क मराठीतून सांगितलं. झारखंडचा असलेला धोनी भारतीय संघातील खेळाडूंना सल्ला देताना त्यांच्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो.

भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना जिंकून मालिका 4-1 ने खिशात टाकली. यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीचं महत्त्व अधोरेखित झालं. अलिकडे त्याच्या संथ खेळीवरून अनेकांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. पण फलंदाजीत जरी तो कमी पडत असला तरी मैदानावर यष्टीमागे त्याचा कोणीही हात धरू शकत नाही.

संबंधित बातमी : ICC पण म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायची नसते

First published: February 4, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading