Home /News /news /

आई, मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनेल, नको ना सोडून जाऊ आम्हाला'

आई, मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनेल, नको ना सोडून जाऊ आम्हाला'

ज्ञानेश्वरीने तिच्या आईला हाक मारत आधिकारी बनण्याचे वचन दिलं, त्यावेळी अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायाचा अश्रूंचा बांध फुटला.

  आंबेगाव, 04 मार्च : 'आई.... मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नको ना सोडून जाऊ आम्हाला…' दहावीच्या पेपरला जायच्या आधीच ज्ञानेश्वरीची आई या जगातून सोडून गेली होती.  ज्ञानेश्वरीने तिच्या आईला हाक मारत आधिकारी बनण्याचे वचन दिलं, त्यावेळी अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायाचा अश्रूंचा बांध फुटला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धामणी येथील गवंडीमळा येथे घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरीची तिच्या आईने साथ सोडली ती दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच. सविता दादाभाऊ गवंडी (वय 33) असे ज्ञानेश्वरीच्या आईचं नाव आहे. मंगळवारी सकाळी दहावीचा पेपर होता  आणि सोमवारी रात्री ज्ञानेश्वरीच्या आईने जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आईचे अंत्यदर्शन घेऊन आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथील ज्ञानेश्‍वरीने आईला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी  दहावीचा पहिला पेपर दिला. सोमवारी रात्री ज्ञानेश्वरी आईजवळ बसून दहावीच्या पेपरचा अभ्यास करत रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधी झाल्यानंतर थेट परीक्षा केंद्रावर ज्ञानेश्वरी दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी तिचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी आधार देण्याचा प्रयत्न केला. गवंडी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील दादाभाऊ यांनी शेती व्यवसायातून दोघांचे शिक्षण केले आहे. मात्र, दोन वर्षांपासून सविता या आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. अखेर त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची वाताहात झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे. दादाभाऊ गवंडी यांना तुषार आणि ज्ञानेश्वरी अशी दोन मुलं असून तुषारने नुकतीच बारावीचे पेपर दिले आहेत. लहान वयातच आईच्या जाण्याने ज्ञानेश्वरीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यातून दहावीची परीक्षेचा डोंगर पार पडण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवून आईला दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण करणार आहे. ज्ञानेश्वरीची जिद्द कायम आहे. मात्र, तिला आईच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता गरज आहे ती दानशुरांच्या आधाराची.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या