प्रत्येकाच्या जीवाला घोर लावणारा निघालाय परतीच्या प्रवासाला

प्रत्येकाच्या जीवाला घोर लावणारा निघालाय परतीच्या प्रवासाला

पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यातून रजा घेणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालाय. पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यातून  रजा घेणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. गेल्या चार महिन्यांत प्रत्येकाच्या जीवाला घोर लावल्यानंतर, उरलेल्या तीन-चार दिवसात राज्यात परतीचा पाऊस बरा पडेल ही आशा देखिल आता मावळलीय.

सप्टेंबर महिन्यातही मुंबईसह राज्यात कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यात ऐन रब्बीच्या तोंडावर राज्यात रासायनिक खतं महागल्यानं बळीराजाच्या चिंतेत भर पडलीय. रासायनिक खतांच्या गोण्या 100 ते अडीचशे रुपयांनी महागल्यात. १०:२६:२६, डीएपी, १२:३२:१६, पोटॅश या खतांच्या किंमतीही १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यात. आधीच मान्सूनचा छळ आणि त्यात आता खत दरवाढीचा फटका यामुळे शेतकरीदादा अधिकच मेटाकुटीला आलाय.

मांजरा धरणातील पाणीसाठा संपला; लातूर शहरावर पाणीटंचाईचं संकट! 

लातूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी विविध ठिकाणांहून रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं. लातूर शहरावर आता पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ आलीय. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातला पाणीसाठा संपला असून, आता केवळ मृतसाठ्यावर शिल्लक असल्यानं लातूरकरांचा घसा पुन्हा पाण्यासाठी कोरडा पडण्याची चिन्ह निर्माण झालीयेत.

यावर्षी आवश्यकतेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणचा पाणी साठा कमी झालाय. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणात सुद्धा अत्यल्प जलसाठा उरला असून, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठलाय. विशेषतः साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला ज्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो, त्या मांजरा धरणातला पाणी साठा संपला असून गेल्या दोन दिवसांपासून धरणातल्या मृत पाणीसाठ्यावर लातूरकरांची तहान भागवली जातेय.

सध्या लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतोय. लातूरकरांना मृतसाठ्यावर येणारी दहा महिने काढावी लागणार आहेत, त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलंय. तर परतीचा पाऊस लातूर जिल्ह्यात चांगला होईल आणि पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची शक्यता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वर्तवलीय.

 VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 08:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading