मान्सून सर्व महाराष्ट्रात सक्रिय, जोरदार पावसाची शक्यता

मान्सून सर्व महाराष्ट्रात सक्रिय, जोरदार पावसाची शक्यता

पुढचे दोन दिवस मान्सून आपला पहिला स्पेल पूर्ण करेल त्यानंतर थोडीसी उसंत घेऊन राज्यभर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • Share this:

पुणे 25 जून : मान्सून आज खऱ्याअर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालाय. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिलीय. यावेळी मान्सून वायू चक्रीवादळामुळे तब्बल 15 दिवस उशिराने दाखल झाल्याने बळीराजा चिंतेत होता. अखेर गेल्या 20 तारखेला मान्सून तळकोकणात दाखल झाला आणि त्यानंतर पुढच्या पाच दिवसात नियोजित वेळेनुसार संपूर्ण महाराष्टात मान्सून सक्रिय झालाय. पुढचे दोन दिवस मान्सून आपला पहिला स्पेल पूर्ण करेल त्यानंतर थोडीसी उसंत घेऊन राज्यभर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत सक्रिय

मुंबईकरांना आस लागून राहिलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यतील इतर भागांमध्ये मान्सून सक्रीय झाल्यानंतर मुंबईकरांना मात्र मान्सूनची प्रतिक्षा होती. पण, आता मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा संपली असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पावसाअभावी सध्या मुंबईकर उकड्यानं देखील हैराण आहेत. शिवाय, पाणी कपातीचा देखील मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. पण, मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिल्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट देखील लवकरच टळण्याची शक्यता आहे. तसंच उकाड्यानं हैराण मुंबईकरांचे डोळे देखील पावसाकडे लागून राहिले आहेत. पण, आता लवकरच दिलासा मिळणार आहे. जूनचे तीन आठवडे हे कोरडेच गेले आहेत.

केरळमध्ये 7 जून रोजी दाखल झालेला मान्सून वायू चक्रीवादळामुळे राज्यात उशिरानं दाखल झाला. पण, मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसानं मात्र हजेरी लावली आहे. राज्यात भीषण दुष्काळ असून पावसामुळे अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

कोकणात पोहोचला

कोकणात देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये शेतीच्या कामांना जोर चढला आहे. लोकांनी पेरण्या देखील केल्या आहे. 7 जून ही मान्सून दाखल होण्याची तारीख पण, वायू चक्रीवादळाचा परिणाम हा मान्सूनच्या गतीवर झाला. त्यामुळे जवळपास 8 ते 10 दिवस उशिरानं पाऊस कोकणात दाखल झाला. मान्सून आता मुंबईत दाखल झाल्यानं राज्याचा सर्व भाग मान्सूननं व्यापून गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 09:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading