कोलकाता, 19 एप्रिल : बंगळुरू संघानं आपल्या नवव्या सामन्यानंतर आयपीएलच्या बाराव्या हंगमात आपला दुसरा विजय मिळवला. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूनं 213 धावांपर्यंत मजल मारली त्याला उत्तम साथ दिली ती, मोईनं अलीनं. मोईन अलीच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला चांगल्या स्थितीत पोहचवले.
मोईन अलीने 66 तर कर्णधार विराट कोहलीने 58 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला आणि त्यांची पिसं काढली. यात कोलकाताचा फरकी गोलंदाज कुलदीप यादवची तर शाळाच घेतली. त्याला चार ओव्हरमध्ये तब्बल 59 धावा मारल्या. आपल्या चार ओव्हरमध्ये कुलदीपनं 5 षटकार आणि 5 चौकार दिले.
यावेळी कुलदीप यादव मैदानातच रडताना दिसला. त्याचं कारण होतं मोईन अली. कुलदीपच्या 16व्या ओव्हरमध्ये मोईन अलीनं 4, 6, 4, 6, 6 अश्या 27 धावा घेत त्याची शाळा घेतली. ओव्हर संपल्यानंतर कुलदीप आपल्या टोपीत तोंड घालून रडताना दिसला.
त्याच्या या कामगिरीमुळे कुलदीप यादव आयपीएलमध्ये सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने इम्रान ताहीरच्या विक्रमाशी बरोबरी केली. इम्रान ताहीरने २०१६ साली मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात ५९ धावा दिल्या होत्या.