पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा नेमका झाला तरी कसा ?

पंजाब नॅशनल बँकेतील 11, 500 कोटींच्या घोटाळ्याने फक्त बँकिंग क्षेत्रच नाहीतर संपूर्ण देश पुरता हादरून गेलाय. विजय मल्ल्याने तरी थेट बँकांची कर्ज बुडवली पण डायमंड किंग नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'चा असा काही गैरवापर केला की, त्या बँकेला देखील अजून नीटसं कळलेलं नाही, की हा घोटाळा नेमका झाला तरी कसा ?

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2018 07:02 PM IST

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा नेमका झाला तरी कसा ?

15 फेब्रुवारी, मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील 11, 500 कोटींच्या घोटाळ्याने फक्त बँकिंग क्षेत्रच नाहीतर संपूर्ण देश पुरता हादरून गेलाय. विजय मल्ल्याने तरी थेट बँकांची कर्ज बुडवली पण डायमंड किंग नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'चा असा काही गैरवापर केला की, त्या बँकेला देखील अजून नीटसं कळलेलं नाही, की हा घोटाळा नेमका झाला तरी कसा ? म्हणूनच आम्ही तज्ज्ञांकडून या घोटाळ्याची 'मोडस ऑपरेंडी' समजून घेतली तेव्हा या डायमंड किंग नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला नेमकं कसं ठगवलं हे लक्षात आलं.

घोटाळा कसा झाला ?

नीरव मोदी हा देशातील बड्या नेत्यांच्या वर्तुळात फिरणारा एक मोठा हिरा व्यापारी, त्यामुळे बँकांकडूनही त्याला नेहमीच रेड कार्पेट ट्रिटमेंट मिळायची, याचाच गैरफायदा घेत त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'ची सुविधा मिळवली. आता तुम्ही म्हणाल की, ही 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' नेमकी काय भानगड आहे ? तर लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एक एका बँकेकडून दुसऱ्या बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी दिली जाणारी पतहमीच होय ! म्हणजे समजा संबंधीत कर्जदाराने त्या बँकांची कर्ज बुडवली तर लेटर ऑफ अंडरटेकिंग देणाऱ्या बँकेनं ती रक्कम चुकती करणं अपेक्षित असतं पण त्यासाठी ही पतहमी देणारी बँक संबंधीत खातेदाराकडून ठराविक अनामत रक्कमही स्वतःकडे ठेऊन घेत असते. थोडक्यात याच पतहमीच्या म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या जोरावर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी त्यांच्या नावावरील डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले.

या तीन कंपन्यांनी हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी ही लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवली होती. प्रत्यक्षात मात्र 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'साठी आवश्यक रक्कम पंजाब नॅशनल बँकेत भरलीच गेली नव्हती. ही रक्कम थोडीतिडकी नाहीतर तब्बल 11, 500कोटींची होती. तरीही पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापनाच्या लक्षात कशी आली नाही हाच खरा प्रश्न आहे. याचाच अर्थ या घोटाळ्यात बँकेचे उच्चपदस्थ अधिकारीही सामील असणार, हे एक उघड गुपित आहे. कारण नीरव मोदीकडून परदेशात पैसे ट्रान्सफर करताना दाखवण्यात आलेला आयातीचा व्यापार प्रत्यक्षात झालाच नसल्याचं कळंतय.

दरम्यान ही सगळी हेराफेरी करणारा नीरव मोदी भारताबाहेर असून त्याच्याविरोधात सीबीआयनं लुकआऊट नोटीस काढलीय. या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेच्या 10 अधिकाऱ्यांचेही हात गोवले गेलेत, त्यांच्याविरोधातही कारवाई होणार आहे. पण लंडनमध्ये लपून बसलेल्या विजय मल्ल्याप्रमाणे नीरव मोदीही भारतीय तपासयंत्रणेच्या हातून निसटलाच कसा असा प्रश्न आता संपूर्ण देशाला पडलाय. याच मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय. कारण हाच नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावोस दौऱ्यात सहभागी होता. पंतप्रधान मोदींनीच नीरव मोदीला पाठिशी घातल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...