सोची(रशिया),ता.21 मे : अनौपचारिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोची शहरात दाखल झाले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि मोदी यांच्यात यांच्यात ही शिखर परिषद होणार आहे. रशियातल्या सोची या पर्टनस्थळी होत असलेल्या या शिखर परिषदे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
पुतीन यांची दोन आठवड्यांपूर्वीच रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती त्यानंतर त्यांनी लगेचच मोदी यांना या परिषदेसाठी आमंत्रण दिलं होतं. या आधी वुहान इथं चीनचे अध्यक्ष शी जिनपींग आणि मोदी यांची अशीच अनौपचारिक शिखर परिषद झाली होती.
आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा परिषदांना अतिशय महत्व असते. व्दिपक्षीय संबंधांवर या भेटीत विस्तृत चर्चा होणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले हे रशियाच्या भेटीवर गेले होते. या भेटीत त्यांनी मोदी-पुतीन शिखर परिषदेची पूर्व तयारी केली होती.
या महत्वाच्या चार मुद्यांवर होणार चर्चा
1) इराण : इराण सोबतचा अणुकरार अमेरिकेनं मोडल्यानंतरची स्थिती.
2) आंतरराष्ट्रीय सहकार्य :अफगाणिस्तान आणि सीरियातली स्थिती आणि भारत-रशियाची भूमिका.
3) नागरी अणुकरार - रशियाच्या मदतीनं तमिळनाडूतल्या कुडनकुलम इथं रशियाच्या मदतीनं अणुऊर्जेसाठी 6 भट्ट्या उभारण्यात येत आहेत. 2030 पर्यंत 18 नव्या अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत.
4) संरक्षण करार - भारत रशियाकडून नवी क्षेपणास्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्र खरेदी करणार आहे. त्याबबत चर्चा होण्याची शक्यता.
आत्तापर्यंत तीन वेळा भेटले मोदी आणि पुतीन
2015 जुलै - उफा इथं झालेल्या 7 व्या ब्रिक्स शिखर संमेलनात
2015 डिसेंबर - भारत-रशिया शिखर संमेलन नवी दिल्ली
2017 जून - एका आंतरराष्ट्र संमेलनात व्दिपक्षीय संबंधांवर चर्चा