19 फेब्रुवारी, नवी दिली : पीएनबी सारख्या नॅशनल बँकेतील 11,300 कोटींच्या घोटाळ्यावर आरबीआयची वेळीच नजर का पडली नाही, अशी विचारणा केंद्र सरकारकडून आरबीआयला करण्यात आलीय. बँकेत एवढा मोठा आर्थिक घोटा होत असताना आरबीआयची दक्षता यंत्रणा झोपली होती का ? असा खडा सवालच केंद्र सरकारने आरबीआयला एका नोटीशीद्वारे केलाय. केंद्र सरकारने या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची गांभिर्याने दखल घेतली असून सीबीआय, ईडी आणि आयकर अशा तीन तीन विभागांमार्फत कसून चौकशी सुरू आहे.
नीरव मोदी याची डायमंड शोरूम्स आणि मालमत्ता अशा एकूण तब्बल 45 ठिकाणी तपास यंत्रणांनी छापे टाकलेत. सीबीआयने तर घोटाळा झालेल्या पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेवरही छापा टाकून तिथली सर्व कागदपत्र ताब्यात घेतलीत. तसंच या घोटाळ्याप्रकरणी पीएनबी चे अध्यक्ष सुनील मेहता यांच्यासह घोटाळ्यासंबंधीत सर्व अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावलंय. नीरव मोदी यांच्या मालकीचे असलेल्या गितांजली डायमंड शोरूमच्या व्यवस्थाकीय कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केलीय. नीरव मोदी यांची बँक खातीही सील करण्यात आलीत. तसंच गितांजली इतर शोरुम्समधून तब्बल 5100 कोटींचे डायमंड्स जप्त केलेत.