मुंबई, 29 नोव्हेंबर : व्हॉट्सॲप हे सध्याचं संपर्क साधण्यासाठीचं सर्वांत वेगवान आणि लोकप्रिय ॲप आहे. व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून अगदी देश-परदेशात असलेल्या व्यक्तींशीही सहज संवाद साधता येतो. वापरायला सोपं असल्यानं प्रत्येक गोष्टीचे अपडेट देणं अगदी सोपं जातं. व्हॉट्सॲप चॅटमध्ये सर्वांत अलीकडचे मेसेज खाली येतात आणि आधीचे मेसेजेस वर वर जात राहतात. त्याच वेळेस हे मेसेज ज्याला पाठवले आहेत त्याला कधी पाठवले, त्याला कधी मिळाले त्याची वेळही समजते आणि त्यानं ते मेसेज कधी पाहिले आहेत तेही पाठवणाऱ्याला समजतं. त्या संदर्भातली माहिती देणारं वृत्त BGR.IN या वेबसाइटनं दिलं आहे.
युझर्सच्या मदतीसाठी WhatsApp तर्फे प्रत्येक टेक्स्ट बॉक्सवर टाइम स्टॅम्प्स दिले जातात. व्हॉट्सॲपवरील ‘LAST SEEN’ हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं फीचर आहे. ज्याला मेसेज पाठवला आहे त्यानं WhatsApp शेवटचं कधी बघितलं आहे म्हणजेच तो WhatsApp वर शेवटी केव्हा ॲक्टिव्ह होता याची माहिती युझरला मिळते; मात्र ह्या चॅटची वेळ तसंच LAST SEEN चं स्टेटस हे चुकीचंही असू शकतं हे अनेक युझर्सना माहिती नाही. चुकीची वेळ दाखवली गेल्यास त्यामुळे मेसेज पाठवणारा आणि ज्याला मिळाला आहे त्या दोघांसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा : प्रवासाचं तिकीट ते एटीएममधून पैसे काढणे, पेटीएमच्या एकाच कार्डने सर्वकाही शक्य
फोनसाठी तुम्ही टाइम झोन चुकीचा सिलेक्ट केला असेल किंवा वेळ चुकीची सेट केली गेली असेल तर WhatsApp मेसेजेस आणि Last Seen ची वेळ चुकीची असू शकते. त्यामुळेच युझर्सनी त्यांच्या फोनवरचा टाइम झोन योग्य आहे ना हे तपासण्याची गरज आहे असं WhatsApp नं सांगितलं आहे. ही वेळ योग्य सेट होत नसेल तर युझरला ती मॅन्युअली सेट करावी लागेल; मात्र ही वेळ आणि टाइम झोन योग्य सेट करणं गरजेचं आहे.
मेटा Meta (Facebook) या कंपनीची मालकी असलेल्या या ॲप्लिकेशननं आता त्यांच्या युझर्सना तारीख आणि वेळ त्यांच्या ऑटोमॅटिक किंवा नेटवर्क प्रोव्हायडेड टायमिंगनुसार सेट करायला सांगितलं आहे. हे सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाइल प्रोव्हाइडरकडून तारखी-वेळ घेऊन ती तुमच्या फोनमध्ये सेट केली जाईल. हे सेटिंग असतानाही चुकीची वेळ दिसत असली तर मग ती मात्र तुमच्या नेटवर्कची समस्या असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी लगेचच संपर्क साधणं गरजेचं आहे.
हेही वाचा : शेअर बाजारातील घसरणीत 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची Motilal Oswal ची शिफारस
तात्पुरता उपाय म्हणून ही वेळ आणि तारीख तुमची तुम्ही सेट करू शकता. यामध्ये सेटिंगमध्ये तुम्ही योग्य टाइम झोन निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण टाइम झोन हा प्रत्यक्ष वेळेपेक्षा वेगळा असू शकतो. तुमच्या फोनमध्ये टाइम झोन मॅन्युअली सेट करण्यासाठी खालील टप्प्यांचं पालन करा :
1) Android फोनमध्ये Settings या पर्यायामध्ये जावं. त्यात System मध्ये जाऊन Date & time हा पर्याय निवडावा आणि योग्य ते सेटिंग करावं.
2) iPhone मध्ये Settings या पर्यायामध्ये जाऊन General हा पर्याय निवडावा. त्यातून Date & Time हा पर्याय निवडून सेटिंग करावं.
चुकीच्या लोकेशनबद्दलही WhatsApp युझर्सनी जागरूक असणं गरजेचं आहे. काही जण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरून खोटं लोकेशनही सेट करू शकतात. त्याबद्दलही काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.