मुंबई, २४ मार्च- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. निवडणुकांच्या तोंडावर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला अनेकांनी भाजपचा पॉलिटिकल अजेंडा म्हटले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. निवडणुकांच्या आधी सिनेमा प्रदर्शित करून आचार संहितेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
मनसेच्या जनरल सेक्रेटरी शालिनी ठाकरे म्हणाल्या की, ‘गेल्या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की, भाजपने टॉयलेट एक प्रेम कथा आणि पॅडमॅनसारख्या सिनेमांना पाठिंबा देऊन आपल्या योजना प्रमोट केल्या. आता या गोष्टीला वर्षही झालं नसेल आणि भाजपने आता तिच गोष्ट पुन्हा सुरू केली आहे.’
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनेही मनसेला पाठिंबा दिला आहे. दोघांनीही ही अत्यंत वाईट गोष्ट होत असल्याचं म्हटलं. तसेच आपल्या स्टाइलमध्ये या सिनेमाचं प्रदर्शन थांबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. हा सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात अडकताना दिसत आहे. यापूर्वी सिनेमाचे जीतकार म्हणून जावेद अख्तर आणि समीर यांचं नाव जोडण्यात आलं. यानंतर दोघांनीही य सिनेमासाठी एकही गाणं लिहिलं नसल्याचं स्पष्ट केलं.
'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. मोदींबाबतचे कधीही समोर न आलेले पैलू या सिनेमाद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बालपणापासून ते भारताचे पंतप्रधान इथंपर्यंतचा मोदींचा प्रवास नेमका कसा होता? हे या बायोपिकमध्ये दाखवलं जाणार आहे.
'सरबजीत', 'मेरी कोम' यांसारखे यशस्वी सिनेमा देणारे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'पीएम नरेंद्र मोदी'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे मोदींच्या गुजरातमध्येच झालं आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र ट्रेलरनंतर आता मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील नेमक्या कोणकोणत्या बाबींवर प्रकाश टाकला जाणार आहे. याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका