नाशिक, 27 ऑगस्ट: राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पासचा काळा बाजार सुरूच आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांच्या गळाला मोठा मासा लागला आहे. बनावट ई-पास बनवणाऱ्याच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) तालुका पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
हेही वाचा...पुण्यात अल्पवयीन मुलाची 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
नाशिक पोलिसांनी एकाला डोंबिवलीत अटक केली. कृष्णा उर्फ राकेश सुर्वे असं आरोपीचं नाव असून तो रत्नागिरीचा रहिवासी आहे. राकेश हा मनसेचा तालुका पदाधिकारी आहे. तो गुहागरचा मनसे तालुका संपर्क सचिव आहे. राकेश बनावट ई-पास तयार करून गरजूंना 2 हजार रुपयांत विकत होता. आरोपी राकेश सुर्वे याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, टॅब जप्त केली आहे
मनसेनंच केली होती मागणी...
बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा, अशी तक्रार मनसेचे संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, आता पोलिस तपासात मनसेचं पितळ उघडं पडलं आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आता क्यू-आर कोड पासही बनावट, तरुणीला अटक
दुसरीकडे, बनावट ई-पासचा क्यू-आर कोड देखील फेक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आयुषी गुप्ता ही तरुणी एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करते. मात्र, आपण मुंबई महापालिकेत संगणक ऑपरेटर असल्याचे सांगून बनावट क्यू आर कोड पास तयार करून देत होती.
मिळालेली माहिती अशी की, आयुषी ही नालासोपारा येथे राहते. ती मरिन लाईन्स येथील दुकानात कामाला होती. कामानिमित्त नालासोपारा ते मरिन लाईन्स असा रोज लोकलने प्रवास तिला करावा लागत होता. बोरीवली स्थानकातील गेट क्रमांक 10 वर तिकिट तपासणीसांकडून तपासणी सुरू होती. यावेळी आयुषीकडील क्यू-आर पास स्कॅन केले असता पासवरील माहिती आणि स्कॅनमधील माहितीमध्ये तफावत असल्याचे तिकिट तपासणीसांना आढळले.
हेही वाचा...चालत्या-बोलत्या महालक्ष्मी.. सासूबाईनं केलं दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन!
या प्रकरणी अधिक चौकशी केली असता आयुषीनं बनावट क्यू-आर पासच्या मदतीने मासिक पास काढल्याचं स्पष्ट झालं. याबाबत बोरीवली रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. बनावट क्यू-आर कोड पास बनवून रेल्वेची फसवणूक केल्याप्रकरणी आयूषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.