• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • राज ठाकरे इन अॅक्शन; आज मनसेचा महामोर्चा, संपूर्ण मुंबईत भगवं वादळ

राज ठाकरे इन अॅक्शन; आज मनसेचा महामोर्चा, संपूर्ण मुंबईत भगवं वादळ

मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 फेब्रुवारी : मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनसेचा मोर्चा आझाद मैदानात पोहचल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी एक भव्य स्टेज उभारण्याचं काम सुरू आहे. आझाद मैदान हे तारेच्या कुंपणाने दोन भागांत विभागालं गेलं असल्याने तारेच्या आतमध्ये पदाधिकाऱ्यांना बसण्याची सोय तर सामान्य मनसैनिकांना तारेच्या दुसऱ्या बाजूला बसण्याची सोय करण्यात आली आहे. पोलीस बांदोबस्तही भक्कम आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. मोर्चासाठी येणा-या कार्यकर्त्यांच्या गाड्या पारसी जिमखाना येथे लाऊन त्यांनी पायी आझाद मैदानला यावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर मुंबईत मनसेच्या मोर्चाच्या समर्थनासाठी काल मनसेने पुण्यात रॅली आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकरली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे अल्टीमेटम देऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रॅली रद्द करण्यात आली. मनसेच्या आज मुंबईत होणाऱ्या मोर्चामुळे नाशिकमधील मनसे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. या मोर्चात सामील होण्यासाठी मनसैनिकांनी जय्यत तयारीही सुरू केली आहे. त्यानिमित्ताने नाशिकमधील मनसेचं मध्यवर्ती कार्यालयात मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. मनसे महामोर्चाला परवानगी दिली नाही तरी हा मोर्चा निघणारच अशी भुमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. तसंच या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. हर्षवर्धन जाधवांचा पुन्हा एकदा मनसेत प्रवेश शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनीही जाधव यांच्यासोबत मनसेत प्रवेश केला. शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौटगे आणि सेनेचे माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेची वाट धरली आहे. आजच्या मोर्चा आधी मनसेमध्ये मराठवाड्यातून हे मोठं इनकमिंग झालं आहे. बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेला लक्ष्य केलं आहे. बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नसल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सूचक विधान केलं आहे. आम्ही कधीही हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. मात्र, काही मतलबी लोक शिवसेनेवर टीका करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या राजकीय घडामोडीवर राज ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
  Published by:Renuka Dhaybar
  First published: