25 जानेवारी, मुंबई : 'पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनाला पाठिंबा देण्यावरुन मनसे चित्रपट सेनेच्या नेत्यांमध्येच संभ्रम दिसून येतोय. काल मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी पद्मावत बाबत भूमिका स्पष्ट करताना, आम्ही गरज पडल्यास पद्मावतला संरक्षण पुरवू असं म्हटलं होतं. पण आज मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र, या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य केलंय. शालिनी ठाकरेंची ही वैयक्तिक भूमिका असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलंय. त्यामुळे पद्मावत सिनेमाबाबत मनसेची भूमिका नेमकी काय आहे, यावरून मनसे कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.
दरम्यान, मनसेनं पद्मावतला संरक्षण दिलं तर त्याचे विपरित परिणाम होतील, अशा इशारा दिला होता. त्यानंतर अमेय खोपकर यांनी पद्मावत सिनेमाला मनसेकडून कुठलंही संरक्षण पुरवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. येत्या 25 तारखेला पद्मावत सिनेमा मुंबईसह देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्याला करणीसेनेनं तीव्र विरोध केलाय. गुजरातमध्ये पद्मावत सिनेमाच्या निषेधार्थ एका मॉलची जाळपोळ करण्यात आल्याचं वृत्तं आहे. गुडगावमध्ये तर थेट बसेस जाळल्याचीही घटना घडलीय त्यामुळे महाराष्टात चित्रपट प्रदर्शित होणार असूनही अनेक ठिकाणी पद्मावतची पोस्टर्स लागू शकलेली नाही. कुठल्याही परिस्थितीत पद्मावतविरोधातलं आंदोलन मागे घेणार नसल्याचं करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलंय.