तूर घोटाळ्याप्रकरणी राज्यमंत्री अर्जून खोतकरांची चौकशी सुरू

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी एकाच दिवसात तब्बल 187 क्विंटल तूर विकल्याचं उघड

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 23, 2017 10:52 AM IST

तूर घोटाळ्याप्रकरणी राज्यमंत्री अर्जून खोतकरांची चौकशी सुरू

23  मे : शिवसेनेचे नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलिस आणि प्रशासनानं सुरू केली आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विकली असून दोन दिवसात 19 लाख रुपयांची तूर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सध्या जिल्ह्यातील संपूर्ण तूर खरेदीची चौकशी सुरू आहे. त्यात खोतकरांचीही तूर आहे.

शिवसेना नेते असलेले अर्जुन खोतकर वस्त्रोद्योग आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्योद्योग विभागाचे राज्यमंत्री आहेत. खोतकर यांच्या नावे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 187 क्विंटल तूर विकली गेली. 14 फेब्रवारी 2017 या एकाच दिवशी ही तूर विकली गेल्याची नोंद आहे. जालना जिल्ह्यातील हिसवन या गावात तूर पिकवल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं आहे.

खोतकरांचा भाऊ संजय खोतकर यांची पत्नी योगिता खोतकर यांच्या नावे 50-50 क्विंटल अशी एकूण 100 क्विंटल तूर विकली गेल्याची माहिती आहे. पुन्हा 18 फेब्रुवारीला संजय खोतकरांनी 45-45 क्विंटल अशी एकूण 90 क्विंटल तूर विकल्याची नोंद आहे. संजय आणि योगिता यांनी गाडेसावर गाव येथे तूर पिकवल्याचा उल्लेख आहे.

एकूण 377 क्विंटल तूर विकल्याचा आरोप खोतकर कुटुंबावर आहे. खोतकर कुटुंबीयांच्या नावे एकूण 19 लाख 3 हजार 850 रुपयांची तूर विकली गेल्याची माहिती आहे. मात्र खोतकरांनी नाफेड तूर खरेदी घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपली 400 एकर जमिन असल्यामुळे 377 क्विंटल तूर विकल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...