अग्नितांडव! उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग; परिसरात धुराचे साम्राज्य
अग्नितांडव! उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग; परिसरात धुराचे साम्राज्य
Ulhasnagar dumping ground Fire: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आगीवर नियंत्रण आणणं कठिण जात आहे.
उल्हासनगर, 10 मार्च : गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातील लेबर कॅम्पला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातील उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या असून परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. ही आग इतकी भीषण आहे, कित्येक किमीवरून सहज निदर्शनास पडत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी उल्हासनगर अग्निशमन दलाची केवळ एकच गाडी याठिकाणी गेल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 परिसरातील या अस्ताव्यस्त फुगलेल्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आहे. याठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे. आज अचानक या डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याने परिसरातील लोकांची धांदल उडाली आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण भीषण आगीच्या धुरामुळे परिसरातील वातावरण अंधुक झालं आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आगीवर नियंत्रण आणणं कठिण जात आहे. pic.twitter.com/X4RpOLTopa
या डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज शहरातील तब्बल 360 मेट्रिक टन कचरा इथे टाकला जातो. हे अनधिकृत डम्पिंग असून याला हटवण्याची मागणी स्थानिकांनी अनेकदा केली आहे. सध्या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग पसरत चालली आहे. सध्या उल्हासनगर अग्निशमन दलाची केवळ एकच गाडी आग विझवण्याचं काम करत असून पाण्याचे टँकर मागवण्यात आले आहेत.
हे ही वाचा - Breaking: नाशिकमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 25 ते 30 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी
गेल्या महिन्यातही ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागात मोठी आग लागली होती. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला ही आग लागली होती. या आगीचं स्वरुपही अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक होती. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाला होता, तर या आगीत 170 हून अधिक घरं जळून खाक झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.