लग्न मोडलं अन् पुन्हा जेलवारी, एका सुशिक्षित चोराचा डाव त्याच्यावरच उलटला

लग्न मोडलं अन् पुन्हा जेलवारी, एका सुशिक्षित चोराचा डाव त्याच्यावरच उलटला

हल्ली गुन्हेगारी स्वभाव कोणाला काय करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 20 डिसेंबर : हल्ली गुन्हेगारी स्वभाव कोणाला काय करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. छोटे छोटे गुन्हे लपवून समाजात आपली प्रतिष्ठा जपली जावी असा भ्रम बाळगणारे गुन्हेगार कधी कधी मोठा गुन्हा करतात. मुंबईतल्या लोहमार्ग पोलिसांनी सुद्धा असाच एक गुन्हा सध्या उघडकीस आणला आहे.

पोलिसांच्या समोर बुरख्यात बसलेला हा गुन्हेगार बराच सुशिक्षित आहे. मात्र, याच सुशिक्षितपणामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आणि हातात बेड्या पडल्या. आपलं नाव खराब होतंय आणि याचा बदला घेतलाच पाहिजे ही सुडबुद्धी त्याला तुरुंगात न्यायला भाग पडली. आकाश प्रल्हाद नायक असं या अटकेत असलेल्या आरोपीचं नाव आहे. एक गुन्हा लपवता लपवता त्याने दुसरा गंभीर गुन्हा केला आणि तुरुंगात गेला. या गुन्ह्यातला अटक आरोपी एका चोरीच्या गुन्हयातून तुरुंगातून जामिनावर बाहेर पडला होता. पण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित पडताच मुलींकडच्यानी ठरलेलं लग्न मोडलं. मात्र, हे लग्न मोडणाऱ्या मुलीच्या भावाचा काटा काढण्यासाठी त्याला संपवायचा कट रचणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्यात.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकल आणि बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांचे  सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान गोष्टी चोरीस गेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या आरोपींच्या मागावर पोलीस होते. प्रवाशांचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे ऑनलाईन शॉपिंग करण्याचा फंडा आरोपी वापरत असल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार, पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा आधार घेत एकूण तीन आरोपींना वसई आणि इतर परिसरातून बेड्या ठोकल्या. अटक आरोपीवर नवघर,पालघर,बोरिवली आणि इतर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आलंय.

या प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली. मात्र, यातल्या एका आरोपीबद्दल हा खुलासा ऐकून पोलीस सुद्धा चक्रावले. चोरीच्या प्रकरणात तुरुंगात गेल्याची माहिती पडताच ठरलेलं लग्न मोडणाऱ्या मुलीच्या भावाला संपवण्यासाठी आरोपी आकाश नायकने उत्तरप्रदेशवरून गावठी कट्टा मागवला. विशेष म्हणजे, त्याचे पेमेंट पेटीएम या ऑनलाईन पद्धतीने केले आणि इथेच पोलिसांना ठोस पुरावा सापडला. पण समाजात वावरत असताना खोटी प्रतिष्ठा लोकांसमोर टिकवण्यासाठी काय काय करायला भाग पडत हेच यावरून स्पष्ट होतंय.

Published by: sachin Salve
First published: December 20, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading