नवी दिल्ली,ता.14 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान दिलेली भाषणं धमकी देणारी असल्याची तक्रार काँग्रेसनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. अशा भाषणांपासून पंतप्रधानांना परावृत्त करावं अशी मागणीही काँग्रेसनं केलीय.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीनं पाठवलेल्या पत्रात पंतप्रधानांच्या हुबळीत दिलेल्या भाषणांचा उल्लेख केला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, तुम्ही सीमा ओलांडल्यात तर हे महागात पडेल कारण हा मोदी आहे. असा इशारा पंतप्रधान मोदींनी भाषणात दिला होता.
काँग्रेसनं राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, आनंद शर्मा, अहमद पटेल, पी.चिदंबरम यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या आधी कुठल्याही पंतप्रधानांनी एवढया खालच्या पातळीवर जावून प्रचार केला नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयाचा दर्जा राखलाच पाहिजे असंही काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.