मुंबई, 24 डिसेंबर : ब्रिटेनमधून आलेल्या नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने रात्री संचारबंदीची (Mumbai Night Curfew) घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत बेकायदेशीर पार्टी व कार्यक्रम आधीच बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्का (Hookah) जप्त केला आहे.
यामध्ये 80 पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स असून ही छापेमारी गोरेवार पूर्व येथे करण्यात आली होती. यामध्ये एकूण साडेतीन टन हुक्का फ्लेवर्स असून एकाचवेळेस 1 लाख 50 हजार जणं घेऊ शकतात.आरोपी जयकिशन अग्रवाल याने हे हुक्का फ्लेवर्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवले होते.
हे ही वाचा-मुंबई रेल्वेतील धक्कादायक घटना, बलात्कार करून तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकलं
23 डिसेंबर 2020 रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व समाजसेवा शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान मुकादम कंपाउंड, जनरल ए. के. वैदय मार्ग, गोरेगाव (पूर्व) मुंबई या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी कुरार पोलीस ठाणे येथे सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (प्रतिबंध) अधिनियम सन 2018 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूल गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक गुन्हयाचा तपास करीत आहे. पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोआ संजय पाटील, पोनि पोखरकर व पो. उप. नि. बिपीन चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने छापेमारी केली.