Home /News /news /

महाविकास आघाडीत फूट, काँग्रेस-भाजप एकत्र, शिवसेनेशी केली गद्दारी

महाविकास आघाडीत फूट, काँग्रेस-भाजप एकत्र, शिवसेनेशी केली गद्दारी

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत.

    नीलेश पवार,(प्रतिनिधी) नंदुरबार,27 जानेवारी: जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. शिवसेनेला दिलेला शब्द काँग्रेसने ऐनवेळी फिरवला. विषय समिती निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले. विषय समितीमध्ये काँग्रेसचे अभिजित पाटील तर भाजपच्या जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेने दिलेला शब्द काँग्रेसने ऐनवेळी फिरवला. जिल्हा परिषदेत भाजपचा 1 तर काँग्रेसचे 3 सभापती झाल्याने शिवसेनेच्या गोटात प्रचंड नाराजी पसरली आहे. काँग्रेसच्या या गद्दारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल मांडण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले आहे. महिला बालकल्याण सभापतीपदी निर्मला राऊत तर समाजकल्याण सभापतीपदी रतन पाडवी यांनी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या वजनदार नेत्यांनी पक्षांतर केल्यावर चित्र कसं बदलते, हे दिसून आले. पक्षांतराचा सर्वाधिक फटका सत्ताधारी काँग्रेस आणि तत्कालीन विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला बसला आहे. सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळविण्यात अपयश आले असतानाच राष्ट्रवादीची पुरती पीछेहाट झाली. अशातच मागील निवडणुकीत होत्याचे नव्हते असणारी भाजप आणि शिवसेनेने यंदा जोरदार मुसंडी मारली. भाजप आणि काँग्रेस यांना समान जागा मिळाल्याने त्यांना सात जागा मिळालेल्या शिवसेनेचे सहकार्य घेण्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यातच ज्येष्ठ नेते आपल्या घरातच अध्यक्षपद राहण्याची सोय बघत असल्याने सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. मागील निवडणुकीत 56 पैकी 29 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसची घोडदौड रोखली गेली. त्यांना अवघ्या 23 जागांवरच समाधान मानावे लागले. मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याचे झालेले पक्षांतर याला कारणीभूत ठरले. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार चंद्रकात रघुवंशी यांची भूमिका यात निर्णायक ठरली. नंदुरबार तालुक्यात त्यामुळे काँग्रेसला जबर हादरा बसला. तालुक्यात निवडून आलेला एकमेव काँग्रेस सदस्यही रघुवंशी समर्थक आहे. शहादा तालुक्यात दीपक पाटील यांनी भाजपमध्ये केलेल्या पक्षांतरामुळे शहादा आणि तळोद्यात काँग्रेसला फटका बसला. नवापूरचा गड नाईक परिवाराने कायम राखला असला तरी भरत गावित यांच्या रूपाने काँग्रेसच्या दोन जागा या भाजपकडे गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे के. सी. पाडवींच्या गळ्यात आदिवासी विकासमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्याचा काहीसा फायदा अक्कलकुवा तालुक्यात दिसला असला तरी त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव आणि पंचायत समिती अक्राणीवर शिवसेनेने मिळवलेला विजय हा त्यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: North maharashtra

    पुढील बातम्या