मुंबई, 18 नोव्हेंबर : कालपर्यंत सत्तेत सहभागी असणारी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिवसेना राडा करताना दिसत आहे. मुंबईत गिरगावमधल्या मेट्रोसाठी साहित्याची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या काचा शिवसैनिकांनी फोडल्या. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्यावर लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. त्याआधी संसदेच्या परिसरात शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन केलं.
शिवसेनेचे नेतेच त्यांचा पक्ष हा रस्त्यावरचा पक्ष असल्याचं म्हणतात. त्याची शिवसैनिकांनी प्रचिती दिली आहे. मेट्रोला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं मेट्रोचं साहित्य घेऊन जाणाऱ्या डंपरच्या काचा फोडल्या. शिवसेनेनं आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होतं आहे.
मुंबईत काचा फोडून शिवसेनेनं रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. तर दिल्लीतही शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेनं लोकसभेत तहकूब नोटीस दिली. त्यानंतर लोकसभेतून सभात्याग करत शिवसेनेनं त्यांचा विरोध दाखवून दिला.
लोकसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेनं संसदेच्या परिसरात आंदोलन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केलं.
एकंदरीतच 'एनडीए'तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेला शिवसेनेचा हा संघर्ष किती काळ चालेल हे नजिकच्या काळात सिद्ध होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा