Home /News /news /

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 8 वर, नागरिकांनो राहा Alert

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 8 वर, नागरिकांनो राहा Alert

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24X7 हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोरोनाव्हायरस (coronavirus) बाबत काहीही माहिती हवी असल्यास या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : राज्यातल्या नागरिकांनो सावध व्हा ! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या चिनी कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) संशयित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत चीनहून भारतात येणाऱ्या 3,997 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत. यातील आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यापैकी मुंबईतील 5 प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात, पुण्यातील नायडू रुग्णालयात  2 प्रवाशांना तर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रवाशास भरती करण्यात आलं आहे. मुंबईतील 3 प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे एन आय व्ही पुणे यांनी कळवले आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने एन आय व्ही पुणे येथे पाठवण्यात आले असून इतर प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान लवकरच प्राप्त होईल. मात्र राज्यात एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या आरोग्य विागामार्फत चीन आणि विशेष करून वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. 1 जानेवारीपासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येत असून त्यातील महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना सर्दी, ताप किंवा तशी लक्षण आढळली आहेत का ? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का याबाबत विचारणा केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरुन संपर्क साधतील. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्वतयारी केली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्यात आलेत. हेदेखील वाचा - चिनी व्हायरसला भारतीय औषध देईल टक्कर, तामिळनाडूच्या डॉक्टरचा दावा दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24X7 हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोरोनाव्हायरसबाबत काहीही माहिती हवी असल्यास या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. हेदेखील वाचा -  भारतीयांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनमधून 250 जणांची करणार सुटका
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Virus

    पुढील बातम्या