विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 15 जून : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता अवघे काही तास उरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला डोईजड झालेल्या मंत्र्यांना अखेर फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना अखेर डच्चू देण्यात आला हे निश्चित झालं आहे. तसंच आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी वगळण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर मंत्रिमंडळाचा शेवटच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. रविवारी सकाळी 11 वाजता राजभवनाच्या प्रांगणात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. तर त्याचवेळी सध्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यावर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सर्वात नाव पुढे होतं ते प्रकाश मेहता यांचं.
ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून मारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र, मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांकडून ताशेरे ओढण्यात आले आहेत. विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
अखेर फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी एका प्रकारे डॅमेज कंट्रोल करत मेहतांना मंत्रिपदापासून दूर केलं आहे. मेहता यांच्या जागी आता आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे.
तसंच आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दिलीप कांबळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गटातले आहे. या विस्ताराच्या निमित्ताने खडसे यांच्या गटातील एकमेव मंत्री सुद्धा आता बाजूला करण्यात आला आहे. त्यांच्या जागी सुरेश खाडे यांना संधी देण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळात कुणाला संधी?
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके
संजय कुटे, योगेश सागर, अशोक उईके आणि आरपीआयकडून अविनाश महातेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
शिवसेनेकडून कुणाला मंत्रिपद?
शिवसेनेमध्ये अलिकडेच पक्षात आलेले राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि राजेश क्षीरसागर यांना संधी देण्यात आली आहे. तसंच विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना अल्पावधीचं उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही. हे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी आधीच स्पष्ट केलं होतं. यावर उद्या अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. उद्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेचे एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री शपथ घेणार आहे.
रिपाइंला मंत्रिपद!
मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयलाही स्थान मिळणार आहे. कारण, या मंत्रिमंडळात रिपाइंला एक मंत्रिपद देण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला आहे, असं सांगत अविनाश महातेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
===================