राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भूमिकेनंतर शिवसेनेला धक्का, कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भूमिकेनंतर शिवसेनेला धक्का, कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे भाजप-सेना युती पून्हा एकदा राज्यात सत्तेत येईल हे स्पस्ट झालं आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 26 ऑक्टोबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते सत्ता स्थापनेकडे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. 'आम्हाला सत्ता स्थापन करण्यात रस नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो आम्ही मान्य करतो. भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे भाजप-सेना युती पून्हा एकदा राज्यात सत्तेत येईल हे स्पस्ट झालं आहे. आम्ही विरोधात बसू ही भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना भाजप-युतीला कौल दिला. पण एकहाती विजय मिळवू अशी घोषणा करणाऱ्या भाजपला रोखलं देखील आहे. हेच समोर ठेवत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत येतील का? अशी राजकीय समीकरण चर्चेत येऊ लागली होती. पण त्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोधकाची भूमिका मान्य केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत येण्याशिवाय पर्याय नाही. अशात लोकसभेच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी जोर धरला आहे. त्यावर आता शिवसेनेला काय तडजोड करावी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आघडीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सेना-भाजप युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे पाहता युतीत मुख्यमंत्री कोण हीच औपचारिकता बाकी आहे. सेना-भाजप युतीत मंत्री पदाचं वाटप कसं होतं यावरच आता सरकार स्थापनेचा तिढा बाकी असेल. 31 ऑक्टोंबरला सर्वात जास्त जागा असलेला भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल हे नक्की. फक्त मुख्यमंत्री कोण हा याचं अंतिम उत्तर 30 तारखेला अवघ्या महाराष्ट्राला मिळणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. तासभराच्या चर्चेनंतर ही बैठक संपली. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक दिसून आले. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 55 विजयी उमेदवार उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला आहे. शिवसेना आमदारांनी गटनेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या