Live Result North Maharashtra: काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच कमळ फुलणार

एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेल्या माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा हा मतदारसंघ.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 08:41 AM IST

Live Result North Maharashtra: काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच कमळ फुलणार

दीपक बोरसे,(प्रतिनिधी)

धुळे,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

Live Result North Maharashtra: जामनेरमधून भाजपचे गिरीश महाजन आघाडीवर

धुळे ग्रामीण मतदार संघात केवळ पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यातच आहे. त्यामुळे या मतदार संघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच या मतदारसंघात कमळ फुलणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. धुळे ग्रामीण म्हणजे पूर्वीचा कुसुंबा मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेल्या माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा हा मतदारसंघ. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रथमच या मतदार संघावर शिवसेनेचा झेंडा फडकला होता. तो एकमेव अपवाद वगळता अनेक वर्षापासून या मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली होती. अक्कलपाडा धरण या एका प्रमुख मुद्यावरच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली गेली आहे. आताही तोच मुद्दा प्रभावी आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणावर झाले होते. परंतु यावेळी युती-आघाडी झालेली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे. पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ती भाजपसाठी सोडण्यात आली. या मतदारसंघातून भाजपतर्फे अनेकजण इच्छुक होते. मात्र पक्षाने ज्ञानज्योती भदाणे यांना उमेदवारी दिली. गेल्यावेळी त्यांचे पती मनोहर भदाणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र मोदी लाट असतानाही या मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील विजयी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या भाजपा उमेदवारासाठी नेर येथे प्रचार सभा घेऊन केली होती.

Loading...

हा मतदारसंघ 'हायप्रोफाइल' ठरणार

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने'हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, मंत्री जयकुमार रावल यांनी बांधला आहे. शिंदखेडा मतदार संघात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. विशेष म्हणजे शिंदखेडा मतदार संघानवं कधीही एका उमेदवाराला दुसरी संधी दिली नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून जयकुमार रावल सलग दुसर्यादा या मतदार संघातून निवडणून गेले. राज्यात मंत्रिपद मिळाले, तसेच ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख.यंदा जयकुमार रावळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी ने संदीप बेडसे यांना पुन्हा उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं आहे. गेल्या निवडणुकीत आघाडी नसल्याने जयकुमार रावल यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शाम सनेर तर राष्ट्रवादी तर्फे संदीप बेडसे यांनी निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने मतांचा विभाजन होऊन जयकुमार रावल यांनी आपला गड कायम राखत विजय मिळवला होता.मात्र, यावेळेस आघाडी झाल्याने फक्त राष्ट्रवादीने संदीप बेडसे यांना रावल यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं आहे. तर दुसरीकडे युती असतांना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी बंडखोरी करत ओक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

असे असलं तरी खरी लढत ही भाजपचे मंत्री जयकुमार रावळ व राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांच्यात होणार आहे.एकूणच भाजप विरुद्ध सर्व असं चित्र असलं तरी

आघाडी तर्फे एकच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन टळणार आहे.

मंत्री असतांना केलेली विविध विकास कामे, व नदी बारमाही करण्यासाठी बांधलेले बंधारे ही त्यांची जमेची बाजू आहे. शिंदखेडा मतदारसंघात चुरस असून मंत्री जयकुमार रावल हे सलग तिसऱ्यांदा शिंदखेडा मतदार संघात निवडणून येत विजयाची हॅट्रिक मारतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यंदा अगदी एकतर्फी निवडणूक होईल, असे सुरुवातीला वातावरण होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात चित्र पालटले आणि बहुतांशी ठिकाणी युतीविरुद्ध आघाडी अशी चुरश निर्माण झाली.

अभूतपूर्व बंडखोरीने निवडणुकीत भरला रंग..

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात 'इनकमिंग' झाले. परिणामी युतीच्या इच्छुकांनी अभूतपूर्व बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले. त्यातील अनेक इच्छुकांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला. मात्र, तिथेही त्यांच्या वाट्याला निराशाच पडली. त्यामुळे बंडखोरीला चांगलाच ऊत आला. जिथे सेनेला जागा आहे तिथे भाजपचे आणि जिथे भाजपला जागा आहे तिथे सेनेचे बंडखोर उभे ठाकले. विशेष म्हणजे आपापल्या पक्षातून या बंडखोरांना मित्रपक्षाविरोधात उघड उघड रसद पुरवठा झाला. त्यातून युतीविरुद्ध युती अशी विचित्र आणि अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी स्थिती बनली.

मंत्र्यांच्या खडाजंगीने वेधले...

गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या मंत्रिमहोदयांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी झालेल्या खडाजंगीने सगळ्याचे लक्ष वेधले. अखेरच्या टप्प्यात शरद पवारांच्या झंझावाती प्रचाराने राष्ट्रवादीत जान फुंकली. पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता खरा, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 'पोल मॅनेजमेंट'मध्ये आघाडीची मंडळी कमी पडल्याचे जाणवले. अखेर येथे युतीचा वरचष्मा राहील, असा अंदाज जवळपास सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहे.

उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी मतदारसंघांत रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) नव्या वारसदारांसह छगन भुजबळांसारख्या (येवला) दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. मतदारांनी इथे व्यक्तीला प्राधान्य दिले गेले की पक्षाला हा निकष या मतदारसंघातील लढतींत सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31, (भाजप-18, शिवसेना-13) , महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

छगन भुजबळांचं मॅजिक चालणार..

या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला - लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिले आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीनुसार...

2019 विधानसभा निवडणूक

महायुती (भाजप-शिवसेना) - 31

भाजप-18

शिवसेना-13

काँग्रेस-5

राष्ट्रवादी-1

2019 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 15

एनसीपी 05

काँग्रेस 07

अपक्ष 02

2009 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 05

एनसीपी 09

काँग्रेस 06

सपा 01

अपक्ष 05

एमएनएस 03

एकूण जागा - 288

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 08:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...