भाजपमधील अंतर्गत कलह टोकाला.. महापौरांसह आमदारांवर आरक्षण फेरफारचा आरोप

भाजपमधील अंतर्गत कलह टोकाला.. महापौरांसह आमदारांवर आरक्षण फेरफारचा आरोप

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशकात भाजपमधील अंतर्गत कलह टोकाला पोहोचला आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ,(प्रतिनिधी)

नाशिक,7 सप्टेंबर:ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशकात भाजपमधील अंतर्गत कलह टोकाला पोहोचला आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी थेट विद्यमान महापौरांसह आमदरांवर एका जागेच्या आरक्षण फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे लाय डिटेक्टर चाचणी करण्याचीही मागणी केली आहे. या वादाने नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक भाजपमधील अंतर्गत गटबाजी नवीन नाही. यापूर्वी देखील शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याच्या वादातून पालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटीलविरुद्ध भाजप आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. वरिष्ठांनी या वादाची गंभीर दखल घेत तत्कालीन सभागृह नेते दिनकर पाटील यांची सभागृह नेते पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली होती. मात्र, या घटनेला काही महिने उलटत नाही तोच नाशिक महानगरपालिकेतील भाजपच्या विद्यमान गटनेत्यासह तीन नगरसेवकांनी याच आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांचेवर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राची जागेच्या आरक्षणात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राज्यगृह विभागाच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केन्द्राच्या उभारणीसाठी महापालिकेच्या एका जागेचे आरक्षण बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.आणि हिच संधी साधत विद्यमान महापौर रंजना भानसी आणि भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राच्या आरक्षण बदलासोबतच नाशिक रोड परिसरातील एका पालिकेच्या जागेवरच आरक्षण बदलून घेतले. मात्र हे आरक्षण बदलत असताना मूळ ठरावात फेरबदल करण्यात आल्याने हे प्रकरण बाहेर आले आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर महापौर रंजना भानसी यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेराबंद करण्याचा सल्ला देत या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक भाजपमधील सुरु असलेल्या गटबाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

नाशिक महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि त्यावरच राजकारण हे काही नवीन नाही. मात्र पक्षाच्याच गटनेत्यांनीच स्वपक्षाच्याच महापौर आणि आमदारांसह अधिकाऱ्यांची नार्को टेस्टची मागणी केल्याने भ्रष्टाचार किती फोफावलाय हे स्पष्ट होत आहे. मात्र, हा वाद आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप-प्रत्यारोप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने विरोधकांना या प्रकरणाच आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणावरून विद्यमान आमदार आणि महापौरांची वेळीच कानउघडणी केली नाही तर असे अनेक प्रकरण बाहेर यायला वेळ लागणार नाही, असे बोलले जात आहे.

VIDEO:आम्हीही ऐकून घेणार नाही, जलील यांचा 'वंचित'वर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2019 07:23 PM IST

ताज्या बातम्या