ग्वाल्हेर, सुशिल कौशिक, 26 जानेवारी: शाळेतील शिक्षकांना इंग्रजी न येणे, देशाची राजधानी कोणती, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कोण या साध्या प्रश्नांची उत्तरे माहित नसल्याचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण जनतेचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी किमान शिकलेले हवेत ही अपेक्षा करण्यात काही गैर नसावे. एका कॅबिनेट मंत्र्याला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लिहून दिलेले वाचता आले नाही. शेवटी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे भाषण वाचून दाखवले.
मध्य प्रदेशमध्ये नुकतेच सत्तेवर आलेल्या कमलनाथ यांच्या काँग्रेस सरकारमधील महिला व बाल कल्याण मंत्री असलेल्या इमरती देवी यांना ग्वाल्हेर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलवण्यात आले होते. कार्यक्रमात दरम्यान त्या भाषण करण्यास उभ्या राहिल्या. पण त्यांना लिहून दिलेले भाषण काही केल्या वाचता येईना. शेजारी उभ्या असलेल्या जिल्हाधिकऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तरी देखील इमरती देवी यांना काही भाषण करता आले नाही. अखेर त्यांनी स्वत:चे भाषण जिल्हाधिकाऱ्यांना वाचण्यास दिले आणि त्या बाजूला झाल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्री इमरती देवी यांनी तब्येत ठीक नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तुम्ही हव तर डॉक्टरांना विचारू शकता. पण हरकत नाही सर्व काही ठीक झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी माझे भाषण व्यवस्थित वाचले.
राज्य मंत्रिमंडळातील 28 मंत्र्यांमध्ये केवळ दोन महिला आहेत. इमरती देवी या त्यापैकी एक होय. ग्वालियरमधील डबरा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. याआधी त्या अशाच चर्चेत आल्या होत्या. शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनाच केवळ आपले नेता मानत असल्याचे विधान केले होते. इतक नव्हे तर ते आपल्यासाठी देव असून मी ज्योतिरादित्य यांची पूजा करत असल्याचे इमरती म्हणाल्या होत्या.