लखनऊ,ता.01 जून: इतिहासात रमण्याची भाजपच्या नेत्यांची सवय अजून गेलेली नाही. प्राचिन काळात भारतात लाईव्ह टेलिकास्ट आणि टेस्ट ट्युब बेबी सारखं तंत्रज्ञान उपलब्ध होतं असा अजब युक्तिवाद उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी केलाय. कौशल्य प्रक्षिण कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांसमोर बोलत होते.
महाभारत काळात कुरूक्षेत्रावर घडत असलेलं युद्ध संजय दूरदृष्टीने धृतराष्ट्राला सांगत होता. हे लाईव्ह टेलिकास्टचं होतं. आज ईलेक्ट्रॉनिक माडियाचं युग आहे, पण लाईव्ह करण्याचं तंत्रज्ञान हे आजच नाही तर त्या काळातही उपलब्ध होतं.
रामायण काळात पुष्पक विमानांचा उल्लेख आढळतो. त्या काळात रामाने श्रीलंकेवरून अयोध्येपर्यंत प्रवास केला होता.
सीतेचा जन्म हा टेस्ट ट्युब बेबीचाच प्रकार असल्याचे तारेही त्यांनी तोडले. या आधीच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी महाभारत काळात इंटरनेट होतं असं वक्तव्य केलं होतं त्यावरून त्यांच्या विरूद्ध देशभर वादळ उठलं होतं. सोशल मीडियावरही नेटिझन्सनी त्याची खिल्ली उडवली होती.
मात्र एवढी टीका होवूनही भाजपच्या नेत्यांना अजुन शहाणपण येत नाही अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.