भाजपला पहिला धक्का, विद्यमान आणि माजी खासदाराची बंडखोरी

भाजपला पहिला धक्का, विद्यमान आणि माजी खासदाराची बंडखोरी

दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज असून अपक्ष निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यांच्यापाठोपाठ शिर्डीतील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर अपक्ष लढणार असल्याचं जाहीरही करून टाकलं आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली. दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर एकूण 6 खासदारांचा पत्ता कापण्यात आला. यात दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे चव्हाण नाराज असून अपक्ष निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यांच्यापाठोपाठ शिर्डीतील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर अपक्ष लढणार असल्याचं जाहीरही करून टाकलं आहे.

दिंडोरीत चव्हाणांना डावललं

राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या डॉ.भारती पवार यांना दिंडोरी लोकसभा उमेदवार म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज झाले आहे. डॉ भारती यांच्या प्रवेश प्रकरणात पक्षानं विश्वासात न घेतल्याचं त्यांना चांगलंच जिव्हारी लागलं आहे. चव्हाण यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. पक्षाशी प्रामाणिक असतांना चव्हाण यांना का डावललं असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

शिर्डीतून वाकचौरे अपक्ष म्हणून मैदानात

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपात असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी सांगताना शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांवर जनतेची नाराजी असल्यानं ही निवडणूक अपक्ष लढण्याची भूमिका वाकचौरेंनी जाहीर केली आहे.

2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंनी चक्क रामदास आठवले यांचा पराभव केला होता. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या वाकचौरेंना शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेनं त्यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. मात्र, त्याच वाकचौरेंनी 2014 साली शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेतला. तेव्हा मात्र जनतेने त्यांना घरी बसवलं आणि त्यांचा पराभव झाला. नंतर थोड्याच दिवसात ते भाजपवासी झाले आणि श्रीरामपूर विधानसभा लढवली. मात्र, तिथेही त्यांना अपयश आले.

राज्यात भाजप-सेनेची युती होणार नाही आणि आपण भाजपातून शिर्डी लोकसभा लढवू, अशी आशा वाकचौरेंना होती. मात्र, सेना-भाजपची युती झाली आणि वाकचौरेंच्या आशेवरही पाणी फिरलं. शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केलीय तर काँग्रेसने श्रीरामपूर येथील आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची आशा असलेले वाकचौरे आता थेट अपक्ष निवडणूक लढणार आहेत. दोन्हीही उमेदवारांना जनता स्वीकारणार नाही आणि आपण अपक्ष निवडून येवू असा विश्वास वाकचौरेंना वाटतोय.

भाजपात असलेले वाकचौरेंना शिर्डी संस्थानचे विश्वस्तपद दिले गेले आहे. आता वाकचौरे जर अपक्ष निवडणूक लढवणार असतील तर पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार? किंवा त्यांची कशी मनधरणी करणार? हे पहावं लागेल.

सेना काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणाऱ्या लढतीत आता वाकचौरेंनीही उडी घेतल्याने शिर्डी लोकसभेची लढत तिरंगी होणार असून कोण बाजी मारणार हाच खरा प्रश्न आहे.

===============

First published: March 23, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading