• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जास्त जागा देण्यास काँग्रेसचा नकार!

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जास्त जागा देण्यास काँग्रेसचा नकार!

2014 च्या लोकसभेच्या जागांपेक्षा राष्ट्रवादीला यावेळी जास्त जागा हव्या आहेत. मात्र अशा जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवलेली नाही.

 • Share this:
  सागर कुलकर्णी, मुंबई,ता. 12 ऑक्टोबर : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची शुक्रवारी मुंबईत चर्चा पार पडली. मात्र कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. राज्यातल्या दोनही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबतची ही पहिलीच बैठक होती. 2014 च्या लोकसभेच्या जागांपेक्षा राष्ट्रवादीला यावेळी जास्त जागा हव्या आहेत. मात्र अशा जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवलेली नाही. आधी मित्रपक्षांशी चर्चा करून मग अंतिम निर्णय घेऊ अशी काँग्रेसची भूमिका आहे. ही पहिलीच बैठक असल्यामुळं दोनही पक्ष एकमेकांवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करताहेत असं बोललं जातं. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, माणिकराव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद रणपिसे इत्यादी नेते उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलीय. दोन्ही पक्ष काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीत आहेत. तर आमची ताकद वाढली असं सांगत राष्ट्रवादीने 50 टक्के जागांवर दावा केलाय. काय आहे परिस्थिती राष्ट्रवादीकडे सध्या अहमदनगर लोकसभा जागा आहे. ती जागा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना स्वत:च्या मुलांसाठी हवीय. त्या बदल्यात शिर्डी राष्ट्रवादीला देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. यवतमाळ, पुणे लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हवे आहेत. त्यास काँग्रेस फारशी अनुकूल नाही. पुणे शहर लोकसभेच्या जागेची मागणी एनसीपी करत असली तरी त्या ठिकाणी काँग्रेसचे सुरेश कलमाडी प्रयत्नशील आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेसकडे असलेली औरंगाबाद राष्ट्रवादीला पाहिजे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या बदल्यात उस्मानाबादची जागा मागत राष्ट्रवादीची गोची केलीय. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे फक्त एकच जागा आहे. त्यात मित्रपक्ष घेऊ पाहत असलेल्या समाजवादी पक्षाला एक जागा हवी आहे. काँग्रेसची मात्र त्याला तयारी नाही. पालघर लोकसभा जागा दोनही पक्ष बहुजन विकास आघाडीला देण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. राष्ट्रवादीने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 48 पैकी 21 तर काँग्रेसने 27 जागा लढवल्या होत्या. आता राष्ट्रवादीने जास्त जागांवर दावा केल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या राजू शेट्टी आणि समाजवादी पक्षालाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळं ही जुळवाजुळव करायची कशी असा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आहे. भाजपचं मोठं आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आहे. दोघांनी एकत्र निवडणुका लढवायच्या यावर त्यांचं एकमत झालंय. आत भाजप-शिवसेना एकत्र येणार की वेगवेगळे लढणार. शिवसेना आणि मनसेची भूमिका काय राहिल यावर अनेक गणित अवलंबून आहेत.

  पवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी

     
  First published: