ओडिशात भाजपची जोरदार मुसंडी, बीजेडीला धक्का

ओडिशात भाजपची जोरदार मुसंडी, बीजेडीला धक्का

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही ओडिशात भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

  • Share this:

भुवनेश्वर 23 मे : बीजू जनता दलाचा गड असेल्या ओडिशामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची दुहेरी परिक्षा आहे. तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यात लोकसभेसाठी नवीन पटनायक यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. तिथे भाजपने जोरदार मुसंडी मारली असून तब्बल 14 जागांवर आघाडी घेतलीय तर बीजेडीला 20 जागांवर आघाडी आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला तिथे फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्यातलं महत्त्वाचं राज्य म्हणजे ओडिशा. ओडिशामध्ये लोकसभेच्या 21  जागा आहेत. त्यात अनुसूचित जातींसाठी ३ अनुसूचित जनजातींसाठी ५ जागा आरक्षित आहेत. सलग चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळणारे नवीन पटनायक यांचा करिष्मा या राज्यात कायम असला तरी त्यांना यावेळी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने जोर लावला होता. बीजेडीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नवीन पटनायक यांची एकाधिकारशाही असल्याचा आरोप केलाय.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही ओडिशात भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा करिष्मा तिथे सरस ठरला. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सरकारमध्ये असल्याने आता सरकारबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. बीजीडीमध्ये पहिल्यासारखी शिस्तही राहिली नाही. त्यामुळे त्याचा पटनायक यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नवीन पटनायक कुणाच्या बाजूने?

नवीन पटनायक यांनी आपले पत्ते अजुन उघड केलेले नाहीत. आघाडीच्या राजकारणात काही जागा कमी पडल्या तर ते कुणाच्या बाजूने जातील याबद्दल सगळयांना उत्सुकता आहे. निवडणुकीआधी विरोधीपक्षांची महाआघाडीची तयारी सुरू असतानाही त्यांनी त्याबाबत फारसा रस दाखवला नाही. तर भाजपबद्दलही ते तटस्थच राहिले.

ओडिशाच्या विकासासाठी जे कुणी मदत करतील त्यांना आपला पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलची संदिग्धता त्यांनी कायम राखली. पटनायक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून कामही केलं आहे. तर पहिल्यांदा ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढविली होती.

फानी चक्रिवादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहाणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारचं त्यांनी कौतुकही केलं होतं. त्यावेळी नवीन पटनायकही त्यांच्या सोबत होते. त्यामुळे गरज पडली तर नवीनबाबू मदत करतील असं भाजपला वाटतंय.

ओडिशामधल्या मुख्य लढती

भुवनेश्वर

ओडिशातली सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती राजधानी असलेल्या भुवनेश्वर मतदारसंघातली. या मतदारसंघातून IAS आणि IPS राहिलेले दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक हे बीजेडचे उमेदवार होते. तर माजी आएएएस अधिकारी अपराजिता सरंगी या भाजपच्या उमेदवार होत्या. पटनायक यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर तीन वर्षांनी बीजू जनता दलात प्रवेश केला होता. तर सरंगी या केंद्रात अतिरिक्त सचिव होत्या. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. सरंगी यांनी ओरिसात जिल्हाधिकारी, भुवनेश्वर महापालीकेच्या आयुक्त अशा विविध पदांवर काम केलं आहे त्यामुळे त्यांना स्थानिक प्रश्नांचा आणि परिस्थितीचा चांगलाच अभ्यास आहे. तर अरुप पटनाक यांची कारकिर्दही उत्तम राहिलीय. त्यामुळे ही तुल्यबळ लढत झाली.

केंद्रपाडा

बीजेडीमधून भाजपमध्ये आलेल्या महत्त्वाच्या नेत्यांमधलं मुख्य नाव म्हणजे नवीन पटनायकांचे एकेकाळचे महत्त्वाचे सहकारी जय पांडा. भाजपने त्यांना केंद्रपाडा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरुद्ध बीजेडीने ओडिशाचे चित्रपट अभिनेते अनुभव मोहंती यांना तिकीट दिलंय. जय पांडे हे ओडिशातले दिग्गज नेते अजून उद्योगपतीही आहेत. जय पांडा हे नवीन पटनायक यांचे अत्यंत विश्वासू होते. मात्र मतभेद झाल्याने ते पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी बीजेडीने पूर्ण कंबर कसली होती. तर बोजीडीला टक्कर देत कुठल्याह परिस्थितीत पांडा यांना विजय मिळवून द्यायचा असा निर्धार भाजपने केला होता.

पुरी

चार धामांपैकी एक असलेल्या पुरी लोकसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी सोबतच या मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं. मात्र या ठिकाणी भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा यांना उमेदवारी दिली. पात्रा हे प्रवक्ते असल्याने त्यांचा चेहेरा सगळ्यांना ओळखीचा आहे. कट्टर मोदी समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदारसंघातू तेलुगू मतदारांचं मोठं प्रमाण आहे. बीजेडीने त्यांच्याविरुद्ध पिनाकी मिश्रा यांना तिकीट दिलंय. ते पुरीचे विद्यमान खासदार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले सांबित पात्रा हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

असे आहेत या आधीचे निकाल

२०१४ मध्ये बीजेडीला २० तर भाजपला १ जागा मिळाली होती. २००९ मध्ये बीजेडी १४ काँग्रेस ६ तर सीपीआयला १ जागा मिळाली होती. २००४ च्या निवडणुकीत बीजेडीला ११, भाजपला ७ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 09:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading