भाजपच्या मुख्य निवडणूक समितीत खडसेंना वगळून गिरीश महाजनांना स्थान

भाजपच्या मुख्य निवडणूक समितीत खडसेंना वगळून गिरीश महाजनांना स्थान

महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तर आहेतच त्याचबरोबर ते संकटमोचकही ठरले आहेत.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 14 मार्च : निवडणूकीच्या काळात महत्त्वाचं काम करणाऱ्या भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना वगळण्यात आलं आहे. खडसे यांच्या ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांना स्थान देण्यात आलंय. त्यामुळे खडसेंची नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

तर एकनाथ खडसे यांना 10व्या स्थानावर असलेल्या विशेष संपर्क अभियान समितीत स्थान देण्यात आलंय. त्यांच्यासोबत प्रकाश मेहेता आणि शायना एन.सी यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत खडसे हे पक्षाच्या मुख्य समितीत असायचे. मात्र फडणवीसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने खडसे एकाकी पडले आहेत.

भाजपचे  मातब्बर नेते एकनाथ खडसे गेल्या 3 वर्षांपासून अडगळीत पडले आहेत.पक्षाचे जेष्ठ नेते, युतीत कॅबिनेट मंत्री, सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते, सिंचन घोटाळा बाहेर आणणारे नेते, गरज पडली तेव्हा त्यांनी सेनेला अंगावर घेतले. सत्तेत आल्यावर महत्त्वाच्या 10 खात्याचे मंत्री असं असताना खडसेंना राजकारणाची हवा समजली नाही.

भाजपने देवेंद्र फडणवीसांचा चेहेरा समोर ठेवून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा फडणवीसांवर विश्वास. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याने फडणवीसांनी लवकरच पक्षावर पकड निर्माण केली. मात्र एकनाथ खडसे जेष्ठ असल्याने आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची त्यांच्या मनात रुख रुख होती. नंतर त्या अस्वस्थतेतून त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली.

भ्रष्टाचाराच्या आरोपांचं निमित्त झालं आणि खडसेंना राजीनामा द्यावा लागला. नंतर खडसे समर्थकांना एक एक करत भाजपमधून वेगळं करण्यात आलं आणि खडसेंची ताकद मर्यादित करण्यात आली. जळगाव विधानपरिषद, जळगाव धुळे महानगरपालिकेत भाजपनं खडसेना पूर्ण बाजूला केलं गेलं आणि सर्व जबाबदारी गिरीश महाजनांवर टाकण्यात आली.

महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तर आहेतच त्याचबरोबर ते संकटमोचकही ठरले आहेत. अनेक अडचणींच्या प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मदत केली आणि अनेक मोहिमा फत्ते केल्या. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पुढच्या हालचालींकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

First published: March 14, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading