• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, मराठी भाषिक अपमानाचा काढणार वचपा?

बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, मराठी भाषिक अपमानाचा काढणार वचपा?

आंदोलन आणि वादाच्या काळामध्ये बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर (Belgaum Lok Sabha by-election announced) झाली आहे.

  • Share this:
बेळगाव, 16 मार्च : मराठी अस्मिता जपत सीमाभागातील 865 गावं आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. कानडी अत्याचार सहन करत आहेत. तरीही सीमाभागात मराठी भाषिक मराठी धर्म जगत आहे. पण याच मराठी अस्मितेवर कानडी वरवंटा फिरवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बेळगाव महापालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) कन्नड संघटनांनी लावलेला वादग्रस्त झेंडा तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण याच सगळ्या आंदोलन आणि वादाच्या काळामध्ये बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर (Belgaum Lok Sabha by-election announced) झाली आहे. सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोट निवडणूक होत आहे. सलग चार वेळा या मतदारसंघावर भाजपचीच मक्तेदारी पाहायला मिळाली खरी, पण आता कन्नड संघटनांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांना मराठी भाषिक दणका देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या भाजपकडून बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी श्रद्धा अंगडी यांचे नाव चर्चेत आहे. दिवंगत अंगडी यांची ती कन्या असून भाजपचे कर्नाटकमधील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची ती सून आहे. त्याचबरोबर आरएसएस संबंधित काही नावही भाजपकडून चर्चेत आहेत. सोबतच महांतेश कवडगीमठ या विधान परिषदेच्या आमदारांचे नावही लोकसभेसाठी चर्चेत आहे. हेही वाचा - पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? दुसरीकडे, काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांच्यासह अन्य नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण कुठल्याही राजकीय पक्षाकडून अजूनही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. पहिल्यांदा कोण उमेदवार जाहीर करणार याकडे दोन्ही मोठ्या पक्षांचे लक्ष लागलं आहे . महत्त्वाचं म्हणजे जर भाजपकडून लिंगायत समाजाचा उमेदवार देण्यात आला तर काँग्रेसकडूनही लिंगायत समाजाचा उमेदवार दिला जाऊ शकतो, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषिकांची मतेही निर्णायक असणार आहेत. सध्या वादग्रस्त झेंड्यामुळे बेळगाव आणि सीमा भागातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठी भाषिक कोणाच्या पाठीशी राहणार आणि कानडी अत्याचार, वादग्रस्त झेंडा या सगळ्याचा वचपा काढणार का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार, याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published: