नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाच्या माहामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्याची वेळ आली. या लॉकडाऊनमुळे देश एका क्षणात ठप्प झाला. यामुळे, अनेक समस्या समोर आहेत, परंतु कोरोनाचा प्रसार थांबवण्यासोबतच पर्यावरणामध्ये चांगले बदल होत आहेत. लॉकडाऊनला एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. यादरम्यान ना रस्त्यावर वाहनं धावत आहेत ना कारखान्यांच्या चिमण्यांमधून विषारी धूर बाहेर येत आहे. याचा परिणाम देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील काही अति प्रदूषित भागात दिसून आला. सगळ्यात जास्त प्रदुषण असणारे ही शहरं आता ग्रीन झोनमध्ये बदलत असल्याचं दिसून आलं.
लॉकडाऊनमुळे या ठिकाणी आता प्रदूषण कमी झालं आहे. केंद्र सरकारतर्फे चालवल्या जाणार्या वायु गुणवत्ता, हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीचे (साफर) संचालक गुफरन बेग म्हणाले की, लॉकडाऊन करण्यापूर्वी दिल्लीतील आठ प्रदूषित जागा आता ग्रीन झोन झाल्या आहेत. या भागात विनोबापुरी, आदर्श नगर, वसुंधरा, साहिबाबाद, आश्रम रोड, पंजाबी बाग, ओखला आणि बदरपुर यांचा समावेश आहे. बेग यांनी लॉकडाऊनपूर्वी आणि दरम्यान दिल्लीच्या वायू प्रदूषणाचा एक विस्तृत नकाशा देखील काढला आहे.
तर मुंबई महानगरामध्ये वरळी, बोरिवली आणि भांडुप भागात स्वच्छ हवेची नोंद झाली आहे. दिल्ली आणि मुंबईतील प्रदूषणाच्या या हॉटस्पॉट्समध्ये औद्योगिक उपक्रम किंवा वाहतुकीमुळे अधिक प्रदूषण होतं. या भागांतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) आता 'चांगल्या' किंवा 'समाधानकारक' प्रकारात मोडतो. एक्यूआय 51-100 दरम्यान 'समाधानकारक', 101-200 दरम्यान 'मध्यम', 201-300 मध्ये 'खराब', 401-500 दरम्यान 'अत्यंत' गरीब म्हणून गंभीर मानलं जातं.
दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद इथं हवेचा अभ्यास केला असता प्रदुषामध्ये चांगले बदल झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील लॉकडाऊन दरम्यान पीएम (Particulate Matter ) 2.5 मध्ये 36 टक्क्यांनी घट झाली आहे, तर पीएम 10 मध्ये 43 टक्क्यांनी घट झाली आहे. गाडीतून निघालेलं नायट्रस ऑक्साईड 52 टक्क्यांनी घटलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (सीपीसीबी) पीएम 2.5 पातळीत 46 टक्के घट नोंदवली आहे आणि राष्ट्रीय राजधानीत पीएम 10 पातळीत 50 टक्के घट नोंदवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona