ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' !

ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' !

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातल्या 6 वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प बंद पडलेत. त्यामुळे मुंबई, उपनगरं आणि ठाण्यात, पुण्यातही वीज भारनियमन सुरू झालंय. राज्यात सध्या शहरांमध्ये सरसकट तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झालंय.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातल्या 6 वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प बंद पडलेत. त्यामुळे मुंबई, उपनगरं आणि ठाण्यात, पुण्यातही वीज भारनियमन सुरू झालंय.. राज्यातल्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये दररोज 34 रेक कोळशाची गरज लागते. मात्र, सध्या राज्याला फक्त 22 रेक कोळसा उपलब्ध होतोय. त्याचा वीज निर्मितीवर विपरीत परिणाम झालाय. अशातच ऑक्टोबर हिट वाढू लागल्यानं आणि पाऊसपाणी चांगला झाल्याने शेतीपंपांसाठीही विजेच्या मागणीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे राज्यात भारनियमनात मोठी वाढ झालीय.

भारनियमनाचा चटका यापूर्वी फक्त ग्रामीण भागालाच बसत होता. पण आता या कृत्रिम वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचं भारनियमन सुरु झालं आहे. ऐन ऑक्टोबर हिटमध्येच नागरिकांना हा भारनियमनाचा शॉक बसतोय. याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. राज्यात सध्या शहरांमध्ये सरसकट तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झालंय. भांडूप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज भारनियमन लागू करण्यात आलं आहे. कालपासूनच हे नवीन भारनियमन लागू झालं आहे.

वीजनिर्मितीसाठी लागणारा पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. राज्यात 2200 ते 2300 मेगावॉटचे भारनियमन होत असल्यानं, कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आली आहे. भारनियमनाचं संकट वाढत आहे, त्यामुळे दिवाळीवरही भारनियमनाचं सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण कंपनीची धावपळ सुरु आहे.

राज्यात विजेची मागणी 17500 मेगावॅट असताना प्रत्यक्षात फक्त 16000 मेगावॅट वीज उपलब्ध होतेय. यासह वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं.

राज्यात सध्या कृषी वीज बिलं थकीत आकडेवारी 20 हजार कोटींच्या घरात आहे. राज्यात 40 लाख कृषी वीज पंप आहेत. या सर्व कारणांमुळे महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ऐन ऑक्टोबर हिटमध्ये भारनियमनाचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

सोशल मीडियावरून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या आघाडी सरकारविरोधात केलेल्या भारनियमनाच्या जाहिराती पुन्हा शोधून काढून पोस्ट केल्या जाताहेत. तर काहीजण विकास अंधारात बेपत्ता झाला अशी कॅम्पेन चालवून सरकारविरोधात रोष व्यक्त करताहेत.

First published: October 6, 2017, 2:03 PM IST

ताज्या बातम्या