पुणे, 23 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल सदस्य नियुक्त आमदारकीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे. 'आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंञिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग, उगीच आम्हाला कशाला बोट लावता?' असा गंभीर आरोप केला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमुळे विधान परिषदेची निवडणूक पुढ ढकल्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाकडून उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. परंतु,राज्यपालांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावाला परवानगी न दिल्यामुळे वाद पेटला आहे.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंच्या आमदार नियुक्तीला हरकत नाही पण.., चंद्रकांत पाटलांचा सवाल
आज पुण्यात 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी महाविकास आघाडीवरच गंभीर आरोप केले आहे. 'उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे, त्यात आम्ही का पुढाकार घ्यावा?' असं म्हणत पाटील यांनी या प्रकरणी हात झटकले आहे.
तसंच, 'आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंञिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा सवाल केला असता, पाटील म्हणाले, 'मी कशाला नाव घेऊ? ज्याला टोपी बसेल त्याला बसेल.' असं म्हणून उत्तर देण्याचं टाळलं.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरून भाजपच्या माजी खासदाराचा राज्यपालांवर निशाणा
'आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत, पण राज्यपालांना दमबाजी करणं कितपत योग्य आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी राजभवन हा राजकीय अड्डा बनू नये, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पाटलांनी आज उत्तर दिलं.
तसंच, 'पीएम केअर्स फंडात मदतीचं आवाहन करण्यावरून चंद्रकांत पाटील ट्रोल झाले होते. या प्रकरणी प्रश्न विचारला असता, पाटील म्हणाले की, आम्ही कधी भाडोञी ट्रोलर्सला घाबरत नाहीत. माझ्या ट्वीटमुळेच 14 जिल्ह्यात पालकमंञी गेले, हे माझं यश आहे. पुण्यातील एका बिल्डर्सच्या ऑफिसमधून ट्रोलिंग होतं आहे, असा आरोपच त्यांनी केला.
हेही वाचा - 'रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे', संजय राऊत भडकले
'कोरोना व्हायरससाठी राज्य सरकारने मदतीचं आवाहन केलं आहे. मुख्यमंञी सहायता निधीतून किती खर्च केला त्याचा हिशेब सरकारनं द्यावा', अशी मागणीच पाटील यांनी केली.परप्रांतीय मजुरांना सरळ एसटी बसेसने त्यांच्या राज्यात सोडा, प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट का दाखवता? पण, मुंबईत कोरोना भडकलेला असताना मजुरांचं स्थलांतर कितपत योग्य आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी निमलष्कर, लष्कराला पाचारण करावं, अशी आमची सूचना आहे. राज्य सरकारनेही कोरोना रोखण्यासाठी स्वत:ची अशी कोणती स्किम आणली ते जाहीर करावं? असा सवालही त्यांनी केला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.