'जलदूत'ने दिलं 'कमळा'ला जीवनदान, काँग्रेसचं पानिपत

'जलदूत'ने दिलं 'कमळा'ला जीवनदान, काँग्रेसचं पानिपत

 • Share this:

21 एप्रिल : लातूर म्हणजे देशमुख आणि देशमुख म्हणजे लातूर असं समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून नेहमीच ठरलेलं होतं. मात्र, यावेळी भाजपने देशमुखांच्या गडाला भगदाड पाडलं. जलदूत एक्स्प्रेसच्या पाण्याने कमळ उमललं असून पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावलाय हे आता जवळपास निश्चित झालंय.

लातूर हा काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. मात्र, आता भाजपने लातूर महानगरपालिकेत देखील चांगली मुसंडी मारत महापालिकेच्या 70 जागांपैकी 38 जागांवर विजय मिळवला. तसंच काँग्रेसला अवघ्या 31 जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून 13 जागांवर थेट 1 जागेवर येऊन ठेपलीये. तर शिवसेनेला मागील निवडणुकीत 6 जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

राज्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला होता. 50 वर्षं सत्तेत असूनही काँग्रेसला लातुरकरांच्या साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नव्हता, पण भाजपने 'जलदूत'च्या माध्यामातून लातुरकरांची तहान भागवली होती. या प्यायलेल्या पाण्याला जागत लातुकरांनी भाजपवर मतांचा पाऊस पाडला आहे.

ज्या महापालिकेत गेली अनेक वर्षं भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, आज त्याच महापालिकेच्या जोरदार मुसंडी मारत,  भाजपकडे आता सत्तेच्या चाव्या जाणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

लातूर महापालिकेचा निकाल 2017

 • भाजप - 38
 • काँग्रेस - 26
 • राष्ट्रवादी -1
 • शिवसेना - 0
 • रिपाइं -0
 • इतर - 0

मागील निवडणुकीचा निकाल

 • राष्ट्रवादी काँग्रेस- 13
 • काँग्रेस- 49
 • शिवसेना- 06
 • रिपाइं- 02

 

First published: April 21, 2017, 2:26 PM IST

ताज्या बातम्या