नवी दिल्ली, 11 जानेवारी : आपल्या देशात अनेक गोष्टी जनतेला सहज समजतात तर काही गोष्टी अनेक वर्षं उलटली तरीही गुपित बनून राहतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूँगा असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचं गुपित अद्याप जनतेला कळालेलं नाही. असंच एक देशातील जनतेचं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या मृत्युचं गूढ अजून उकललेलं नाही ते आहेत भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्री.
भारताचं 1965 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झालं. या युद्धात भारतीय सैन्याने पराक्रमाच्या जोरावर पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. पण 10 जानेवारी 1966 ला पाकिस्तानशी शांती करार करण्यात आला. शास्रीजींनी या करारावर स्वाक्षरी केली आणि अवघ्या 12 तासांत म्हणजे 11 जानेवारी 1966 च्या सूर्योदयाला शास्रीजींचा मृत्यू झाल्याची बातमी आली. सरकारी यंत्रणेनी माहिती दिली की हृदयविकाराच्या झटक्यामुळे शास्रीजींचा मृत्यु झाल्याचं जाहीर केलं. त्यांना 1959 मध्य पहिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कमी काम करण्याचा सल्ला दिला होता पण 9 जून 1964 ला देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांच्यावरील कामाचा ताण वाढतच गेला. आज 55 वर्षांनंतरही शास्रीजींचा मृत्यु नैसर्गिकरित्या झाला की तो राजकीय कट होता आणि त्यांची हत्या झाली याचं ठोस उत्तर मिळत नाही. सरकारनी जरी कारण जाहीर केलं असलं तरीही शास्रीजींचे वैद्यकीय रिपोर्ट आणि त्या रात्रीच्या घडामोडी यात खूप विसंगती आढळते. त्यामुळे हा प्रश्न आजही उपस्थित केला जातो.
ताश्कंदमध्ये होत होता करार
एप्रिल ते 23 सप्टेंबर 1965 या काळात भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. यात भारतीय सैन्यानी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर 4 महिन्यांनी जानेवारी 1966 मध्ये तेव्हा रशियात असणाऱ्या ताश्कंद शहरात भारत आणि पाकिस्तानचे प्रमुख नेते भेटले आणि शांती करारावर स्वाक्षरी केली. पिक्सातनचे अध्यक्ष अयुब खान आणि भारताचे तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. भारतीय लष्कराने जिंकलेल्या भागातील हाजी पीर आणि ठिठवालचा भाग शांती कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला त्यामुळे शास्रीजींवर देशभरातून टीका झाली. त्यांच्या पत्नी ललिता शास्रीही त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या.
ललिता शास्रींची नाराजी
लाल बहादुर शास्रीसोबत त्यांचे माहिती अधिकारी कुलदीप नैयर ताश्कंदमध्ये होते. त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, ‘ त्या रात्री शास्रीजींनी घरी फोन केला होता. त्यांचा फोन मोठ्या मुलीनी उचलला होता. तेव्हा शास्रीजींनी त्यांच्या पत्नीला फोन द्यायला सांगितला. पण मुलीनं उत्तर दिलं तुम्ही हाजी पीर आणि ठिठवाल हा प्रदेश पाकिस्तानला दिल्यामुळे आई नाराज आहे त्यामुळे तुमच्याशी बोलू इच्छित नाही. शास्रीजांना याचा मोठा धक्का बसला असं सागतात की ते रात्रभर खोलीत येरझाऱ्या घालत होते. त्यानंतर त्यांनी सचिव वेंकटरमण यांना फोनवरून निर्णयाबद्दलच्या भारतातील प्रतिक्रियांबद्दल विचारलं. वेंकटरमण यांनी सांगितलं की तोपर्यंत दोनच प्रतिक्रिया आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी आणि कृष्ण मेनन या दोघांनीही शास्रीजींच्या निर्णयावर टीका केली होती.’ करारानंतर 12 तासांतच अचानक शास्रीजींचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यु नैसर्गिक होता की हत्या होती हा प्रश्न उपस्थित होतोच.
बियाँड द लाईन या आपल्या पुस्तकात कुलदीप नैयर यांनी लिहिलंय, ‘त्या रात्री मी झोपलो होतो. अचानक एका रशियन महिलेनी दरवाजा ठोठवला. तिनी मला सांगितलं की तुमचे पंतप्रधान मरणासन्न आहेत. मी तातडीने शास्रीजींच्या खोलीत गेलो तर तिथं रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोस्गेन उभे होते. त्यांनी खुणेनीच सांगितलं की शास्रीजी गेले.’ त्यांनी पाहिलं की शास्रीजींच्या चपला कारपेटवर ठेवल्या होत्या. समोरच्या टेबलावर एक थर्मास फ्लास्क पडलेला होता त्यावरून असं वाटत होतं की शास्रीजींनी तो उघडण्याचा प्रयत्न केला असावा. बाहेरून कुणाला बोलवण्यासाठी एखादी घंटीही त्या खोलीत नव्हती. त्या रात्री शास्रीजी खूपच अस्वस्थ होते असं त्यांच्यासोबत गेलेल्या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांचं मत होतं. शास्रीजींचे स्वीय सचिव जगन्नाथ सहाय यांच्या खोलीचं दार ठोठवून शास्रीजांनी रात्री पाणी मागितलं होतं असं सहाय यांनी कुलदीप यांना सांगितलं होतं. पण त्या दोघांच्या खोलींमध्ये भरपूर अंतर होतं. इतकं चालल्यामुळे कदाचित शास्रीजांच्या हार्ट अटॅकची तीव्रता वाढली असावी.
शास्रीजींना अन्नातून विष दिलं गेलं?
काही लोकांचं असं म्हणणं आहे की शास्रीजींचा मृत्यु झाला त्या दिवशीचं त्यांचं जेवण शास्रीजींचा कूक रामनाथनी तयार केलं नव्हतं तर रशियातील भारतीय राजदूत टी. एन. कौल यांचा कूक जान मोहम्मद याने तयार केलं होतं. जेवण करून शास्रीजी झोपायला गेले. मृत्युनंतर शास्रीजींचं शरीर निळं पडलं होतं त्यामुळे त्यांच्यावर विषप्रयोग झाला असा आरोपही काहींनी केला होता.
शास्रीजींचं पार्थिव शरीर भारतात आणल्यानंतर त्यांच्या पत्नी ललिता यांनी त्यांचा मृत्यु संशयास्पद परिस्थितीत झाल्याचं म्हटलं होतं. जर हृदयविकारानी मृत्यु झाला असता तर त्यांचं शरीर निळं पडलं नसतं आणि शरीरावर पांढरे चट्टे निर्माण झाले नसते असं शास्रीजींच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. याबद्दल शास्री कुटुंबाने कायम प्रश्न विचारले. 2 ऑक्टोबर 1970 ला शास्रीजींच्या जयंतीला ललिता शास्रींनी त्यांच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या दोन्ही मृत्युंमुळे संशय वाढला
सरकारनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केल्यानंतर शास्रीजींचे खासगी डॉक्टर आर. एन. सिंह आणि त्यांचा कूक रामनाथ यांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यु झाला होता. विशेष म्हणजे हे दोघंही ताश्कंदमध्ये शास्रीजींसोबत होते. या दोघांचा मृत्यु झाल्यामुळे चौकशी कमकुवत झाली.
याबाबत तरीही प्रश्न विचारले गेले
शास्रीजींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं नव्हतं. जर ते केलं असतं तर त्यांच्या मृत्युचं खरं कारण समोर आलं असतं म्हणून ते केलं गेलं नाही असं म्हणतात. पंतप्रधानांचा अचानक मृत्यु झाल्यानंतरही पोस्टमॉर्टेम केलं गेलं नाही हे कायमच विवादास्पद राहिलं. अगदी सामान्य घरात जन्म झालेल्या शास्रीजींनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागा होऊन पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास केला होता. त्यांच्या मृत्युशी असलेला रशियाचा संबंध, मृत्युनंतर देहाचा रंग बदलणं, त्यांच्या देहाचं पोस्टमॉर्टेम न केलं जाणं अशा अनेक प्रश्नांमुळे लाल बहादुर शास्रींच्या मृत्युचं गूढ अनुत्तरितच राहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.