कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; अवघ्या तीन दिवसांत 1086 कोरोना बाधित आढळले

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; अवघ्या तीन दिवसांत 1086 कोरोना बाधित आढळले

कुंभमेळ्याला दर वेळी जगभरातून लाखो भाविक गोळा होतात, असा इतिहास आहे. यंदा कोरोनाचं संकट असतानाही नागरिकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली आहे.

  • Share this:

हरिद्वार, 14 एप्रिल: सध्या देशात कोरोनाच्या (Corona) संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे महामारीची (Second Wave) दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर,बहुतांश राज्यांनी निर्बंध लागू केलेले असताना, सोमवारी (12एप्रिल) हरिद्वारमध्ये (Haridwar) कुंभमेळ्यात हजारो भक्तांनी दुसरं शाही स्नान (Holy Dip) केलं. 10 एप्रिलपासून 13 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत कुंभमेळ्याच्या परिसरात 1086 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिसरं शाही स्नान (Shahi Snan)आज (बुधवारी) होतं.

सोमवारी (12एप्रिल) 30लाखांहून अधिक भाविक शाही स्नानाला उपस्थित राहिले असावेत, असा अंदाज आहे. हरिद्वार,डेहराडूनचे काही भाग, पौरी आणि टिहरी या भागांत 387 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सोमवारी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) परिसरात 66 हजार 203 कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

कुंभमेळ्याला दर वेळी जगभरातून लाखो भाविक गोळा होतात, असा इतिहास आहे. यंदा कोरोनाचं संकट असतानाही दररोज या कुंभमेळ्याला 10 लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. एकंदर विचार करता संपूर्ण कुंभमेळ्यात एक ते दीड कोटी लोकांची उपस्थिती असेल.

वाचा: कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या Remdesivir बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

11 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत कुंभमेळा परिसरात 961 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.के. झा यांनी सांगितलं.

उत्तराखंडच्या (Uttarakhand) आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड राज्यात मंगळवारी (13एप्रिल) 1925 नवे कोरोना बाधित आढळले. तसंच, 13 जणांचा मृत्यू झाला. डेहराडून जिल्ह्यात 775, हरिद्वार जिल्ह्यात 594,  नैनितालमध्ये 217,  तर  उधमसिंहनगरमध्ये 172 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.

हरिद्वारमध्ये बुधवारी (14एप्रिल) मेष संक्रांतीच्या औचित्याने शाही स्नान आयोजित करण्यात आलं आहे. यंदाचाकुंभमेळा अशा वेळी होत आहे, की जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. बुधवारी देशात एक लाख 84 हजार 372 नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची देशातली एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशातल्या आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 एवढी आहे. यंदा आठ जानेवारी रोजी अमेरिकेत एकाच दिवशी 3.09 लाख कोरोना बाधितांची नोंद झाली होती.

First published: April 14, 2021, 7:09 PM IST

ताज्या बातम्या