कुटुंब रंगले भांबटेगिरीत, ठाणेकराला घातला तब्बल 1 कोटी 97 लाखांना गंडा!

कुटुंब रंगले भांबटेगिरीत, ठाणेकराला घातला तब्बल 1 कोटी 97 लाखांना गंडा!

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भाबल कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी

खेड, 24 फेब्रुवारी :  जमिनीमध्ये आणि पेट्रोल पंपामध्ये पैसे गुंतवून डबल करून तुमचा फायदा करून देतो, अशी बतावणी करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील एका कुटुंबाने तब्बल १ कोटी ९७ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भाबल कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी चौघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी तीन जण फरार झाले आहे.

या प्रकरणी ठाणे येथील संजय तुकाराम कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड मधील सवेणी भोईवाडी,कातळमाळ येथील नम्रता नितीन भाबल, प्रणाली राजेश भाबल, अक्षय नितीन भाबल, चिन्मय नितीन भाबल, नितीन श्रीराम भाबल, राजेश श्रीराम भाबल, प्रथमेश नितीन भाबल,यांच्यावर भादंवि कलम ४२०,४०६,४०९,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपी हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे.

आधी मैत्री नंतर पैसे लुटले!

भाबल कुटुंबातील सदस्यांनी तक्रारदार कदम यांच्यासोबत घरगुती आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांचा विश्वास मिळवून  कदम आणि त्यांच्या पत्नीला खोटी माहिती सांगून जमिनीमध्ये आणि पेट्रोल पंपामध्ये पैसे गुंतवले तर पैसे डबल करून देतो आणि तुमचा फायदा करून देतो असे सांगून ५२ लाख रुपये घेतले.  तसंच १ कोटी रुपयांच्या पेट्रोल पंपाच्या साठेखतामध्ये आरोपी नितीन भाबल याने स्वतःचे नाव कदम यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन समाविष्ट केलं. तसंच तक्रारदार आणि त्यांची पत्नी आरोपींच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले असता यातील आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने शिवीगाळ आणि दमदाटी केली. आरोपी भाबल कुटुंबीयांनी गैरव्यवहारातून प्राप्त रक्कम एकमेकांच्या नावावर ट्रान्फर केली. तसंच इतर साक्षीदार यांना देखील अशाच प्रकारे पैसे डबल करून देतो, असे सांगून ४५ लाख ४१ हजार रुपयांची देखील फसवणूक केली आहे.

पीएमसी बँकेत केला मोठा गैरव्यवहार!

एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी गाजलेल्या पीएमसी बँक दिवाळखोर प्रकरण या बँकेत खेड मधील शिवखुर्द येथील एका जमीन व्यवहार प्रकरणी एका प्रायव्हेट कंपनी द्वारे पीएमसी बँक मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोटयवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. म्हणून खेड पोलिसांनी खेड शहर आणि परिसरात देखील भाबल कुटुंबीयांकडून विश्वास संपादन करत कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर संपर्क साधण्याचं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, भाबल कुटुंबीयांपैकी नम्रता नितीन भाबल, प्रणाली राजेश भाबल, अक्षय नितीन भाबल, चिन्मय नितीन भाबल यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नितीन श्रीराम भाबल,

राजेश श्रीराम भाबल, प्रथमेश नितीन भाबल यांनाही लवकरच अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published: February 24, 2020, 5:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading