Home /News /news /

भाजप आमदारांच्या मारहाणीमुळेच गर्भपात झाल्याचा नगरसेविकेचा गंभीर आरोप

भाजप आमदारांच्या मारहाणीमुळेच गर्भपात झाल्याचा नगरसेविकेचा गंभीर आरोप

9 नोव्हेंबरला हे मारहाणीचं प्रकरण घडलं होतं. नंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर चांदनी यांना दुखापत झाली आणि त्यांची प्रकृती बिघडली.

    बंगळुरू 1 डिसेंबर: कर्नाटक (Karnataka) मधल्या भाजपच्या एका आमदाराने महिला नगरसेविकेला केलेल्या मारहाण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. या घटनेवेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळेच गर्भपात करावा लागला असा आरोप नगरसेविका चांदनी नायक यांनी केला आहे. चांदनी यांचे पती नागेश यांनी याबाबत कारवाईची मागणी केली आहे. तर आरोप असलेले भाजपचे आमदार सिद्दू सावदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत तज्ज्ञ डॉक्टरांकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 9 नोव्हेंबरला हे मारहाणीचं प्रकरण घडलं होतं. नंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर चांदनी यांना दुखापत झाली आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी त्या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या अशी माहिती नागेश यांनी दिली आहे. ते म्हणाले, घटनेनंतर चांदनी यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पोटात दुखू लागले होते. नंतर 23 नोव्हेंबरला जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मारहाण झाल्यामुळेच असं झालं असेल का असं जेव्हा डॉक्टरांनी आपण विचारलं त्यावेळी डॉक्टरांनी तशीही शक्यता असल्याचं नाकारता येत नाही असं म्हटलं असा दावाही नागेश यांनी केला आहे. भाजपचे आमदार सावदी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 9 नोव्हेंबरला जो प्रकार घडला तो दुर्दैवीच होता. महिलांबाबत असं व्हायला नको होतं. मात्र त्या घटनेमुळेच गर्भपात झाल्याचा आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? बागलकोट जिल्ह्यातल्या महालिंगपूरा नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यावरून हा प्रकार घडला. भाजपचे आमदार सिद्दू सावदी यांनी आपल्याच पक्षाच्या नगरेविकांना मतदानाला जाण्यापासू अडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. सावदी हे टेराल्डचे आमदार आहेत आणि कर्नाटक हँडलूम डेव्हलपमेंट कॉरर्पोरेशन लिमिटेड (केएचडीसी)चे अध्यक्षही आहेत. भाजपच्या नगरसेविका सविता हुरकादली, चांदनी नायक आणि गोदावरी बाट यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर नगरसेविका आणि आमदारांमध्ये वाद झाला. मदतानाच्या दिवशी या नगरसेविकांनी या आमदारांनी मतदानाला येण्यापासून रोखल्याचं व्हिडीओत दिसत होतं. त्याचवेळी झटापट आणि धक्काबुक्कीही झाली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आमदाराविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले होती.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या