कर्नाटक सरकारला हवाय स्वतंत्र ध्वज!

कर्नाटक सरकारला हवाय स्वतंत्र ध्वज!

कर्नाटक सरकारची ही स्वतंत्र ध्वजाची मागणी झालीतर जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारं कर्नाटक हे देशातलं दुसरं राज्य ठरेल, दरम्यान, 2012सालीही कर्नाटकातून अशाच पद्धतीची मागणी झाली होती.

  • Share this:

बंगळुरू, 17 जुलै : जम्मू काश्मीरप्रमाणेच आता कर्नाटक राज्याला आपला स्वतःचा असा राज्यध्वज हवाय. त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 9 सदस्यीय समितीची स्थापना देखील केलीय. भाजपने मात्र, कर्नाटक सरकारचं ही कृती राष्ट्रविरोधी असल्याचं म्हटलंय.

कर्नाटक सरकारची ही स्वतंत्र ध्वजाची मागणी झालीतर जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारं कर्नाटक हे देशातलं दुसरं राज्य ठरेल, दरम्यान, 2012सालीही कर्नाटकातून अशाच पद्धतीची मागणी झाली होती. पण तत्कालीन केंद्र सरकारने ती तात्काळ फेटाळून लावली होती. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर प्रादेशिक अस्मितेचा हाच मुद्दा पुन्हा उकरून काढलाय. एवढंच नाहीतर राज्य ध्वजाची डिझाईन निश्चित करण्यासाठी 9 सदस्यीय समितीची स्थापनाही केलीय.

कर्नाटकमध्ये कालच हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात निदर्शनं झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र राज्य ध्वजाच्या मागणीला हवा देणारं पाऊल उचललंय. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडूनही या भूमिकेचं समर्थन करण्यात आलंय. या राज्य ध्वजामुळे तिरंग्याचा अवमान होणार नसेल तर कर्नाटक राज्याला स्वतंत्र ध्वज असण्यात काहीच गैर नाही. अशी भूमिका काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विटरद्वारे मांडलीय. तर कर्नाटक सरकारचं हे कृत्यं राष्ट्रविरोधी असल्याचं भाजपने म्हटलंय. 'एक राष्ट्र एक निशान' हीच भाजपची भूमिका असल्याचं भाजपचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटलंय.

कर्नाटकात सध्या कन्नड अस्मितेचं राजकारण करणाऱ्या संघटना पिवळ्या आणि लाल रंगाचा ध्वज त्यांच्या आंदोलनादरम्यान आवर्जून वापरत असतात. त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या या स्वतंत्र ध्वजाच्या निर्णयामुळे प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाला नव्याने हवी मिळणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 05:07 PM IST

ताज्या बातम्या