'मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका!'

'मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका!'

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

  • Share this:

08 जून : मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका!, असं पत्र लिहून सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धनाजी चंद्रकांत जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी एक निरोप सोडला आहे.

धनाजी जाधव यांना अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक, सोसायटीच लाखो रुपये कर्ज होतं. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. धनाजी यांनी शेतकरी संपात आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. काल (बुधवारी) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात 'मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाल्याशिवाय मला जाळू नका', अशी विनंती केली आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन चालू शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मागणीला सरकारने गांभीर्याने बघून सकारात्मक पाऊल उचलण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी:

Loading...

मी शेतकरी आहे, माझं नाव धनाजी चंद्रकांत जाधव... मी आत्महत्या करत आहे. योगीराज, युवराज यांच्यावर लक्ष देणे. माझं प्रेत माझ्या गावात घेऊन जाणे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत तोपर्यंत मला जाळायचं नाही. दिगू तात्या, मला जाळू नका, जोपर्यंत माझं किंवा माझ्या मित्रांचं कर्ज माफ होत नाही.

तुमचा मित्र,

धनाजी जाधव

2-3 दिवसांत 6 शेतकऱ्यांची आत्महत्या

शेतकरी संपाच्या काळात फक्त एकट्या धनाजी जाधव यांनी आत्महत्या केलेली नाही तर राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. नांदेडमध्ये काल एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर या गावातील 40 वर्षीय परमेश्वर वानखेडे यांनी शेतातील झाडाला फाशी घेतली. याआधी येवला, सातारा आणि वर्ध्यातही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2017 09:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...