डोंबिवली, 12 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करण्याची संख्याही वाढत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत गेल्या 24 तासांच तब्बल 39 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
डोंबिवलीत सोमवारी संध्याकाळी तब्बल 26 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज मंगळवारी सकाळी 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केडीएमसी महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 39 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
हेही वाचा - रुग्णाला वाचवण्यासाठी डॉ. जाहिद यांनी पत्करला धोका, PPE किट हटवून केले उपचार
विशेष म्हणजे सोमवारी संध्याकाळी पडले गाव येथील निऑन हॉस्पिटलमधून 14 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी आले आहेत. तसंच डोंबिवली येथील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून 5 रुग्णांना तर कल्याणच्या होली क्रॉस रुग्णालयातून 2 रुग्णांना आणि टाटा आमंत्रण येथून 5 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत डिस्चार्ज रुग्णाची ही सगळ्यात मोठी संख्या आहे.
केडीएमसी पालिका क्षेत्रातील 344 रुग्णांपैकी एकूण 130 रुग्ण म्हणजेच 37% रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. निऑन रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांत 2 डायलिसिस रुग्णांचा आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता.
सोमवारी आढळले नवीन 23 रुग्ण
दरम्यान, सोमवारी कल्याण डोंबिवली परिसरात नवे 23 रुग्ण आढळून आले होते. यात एका महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. सोमवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याणामध्ये 18 रूग्ण डोंबिवलीत 3 तर मांडा टिटवाळा येथे 1 रूग्ण आढळून आला. यामध्ये कल्याण पूर्वेतील 15 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, कल्याण पश्चिमेतील दोन मुलं वयवर्ष 9 आणि वयवर्ष 15 असे एकूण पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण डोंबिवलीतून मुंबईत ये -जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.