वॉशिंग्टन, 17 जानेवारी: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्या धोरणांना विरोध दर्शवणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेनं 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या परराष्ट्र मंत्रालयातील महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. भारतीय वंशाच्या या महिलेचं नाव उजरा जेया (Ujra jeya) असून त्यांना आता जो बायडन (Joe Biden) यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. याची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. बायडेन यांनी परराष्ट्र मंत्रालयासाठी जाहीर केलेल्या महत्त्वाच्या पदांच्या नामांकनानुसार, जेया यांना नागरी संरक्षण, लोकशाही आणि मानवाधिकार मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
कोणाला कोणती जबाबदारी मिळाली?
या व्यतिरिक्त, वेंडी आर शेरमन यांना उप परराष्ट्रमंत्री, ब्रायन मॅकेओन यांना व्यवस्थापन आणि संसाधनं उपमंत्री तर बोनी जेनकिन्स यांना शस्त्रास्त्र नियंत्रण व आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयक उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तर व्हिक्टोरिया नुलँड यांना राजकीय कार्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. बायडेन म्हणाले की, 'नामांकित परराष्ट्रमंत्री टोनी ब्लिंकेन यांच्या नेतृत्वात ही टीम माझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. जेव्हा अमेरिका आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्रित काम करतो, तेव्हा तो अधिक बलवान होतो.'
ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात जेया यांनी राजीनामा दिला होता
उजरा जेया यांनी अलीकडेच 'अलायन्स फॉर पीसबिल्डिंग' च्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे. तसेच 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी पॅरिसमधील अमेरिकन दूतावासात उप प्रमुख म्हणूनही काम केलं होतं. पण सप्टेंबर 2018 मध्ये त्यांच्या ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
जेया यांनी यापूर्वी 2012 ते 2014 या काळात लोकशाही, मानवाधिकार आणि कामगार संघटनेत कार्यवाहक सहाय्यक मंत्री आणि प्रधान उप सहाय्यक मंत्री म्हणून काम केलं आहे. 1990 मध्ये त्या परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांनी नवी दिल्ली, मस्कट, दमास्कस, काहिरा आणि किंग्सटन येथे काम केलं आहे.