VIDEO : भीषण अपघातात जीव वाचला पण, पाय गमावला; ट्रकचालकाला जेसीबीने काढलं बाहेर

VIDEO : भीषण अपघातात जीव वाचला पण, पाय गमावला; ट्रकचालकाला जेसीबीने काढलं बाहेर

जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरुडी फाट्याजवळ आज भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

  • Share this:

जालना, 19 सप्टेंबर : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज जालन्यात आला आहे. दोन ट्रकच्या जोरदार धडकेनंतर भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा चुराडा झाला तर ट्रकचालक कॅबिनमध्येच अडकला होता. जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरुडी फाट्याजवळ आज भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले महामार्ग सुरक्षा पथकाचे विजय तुपे, शिवाजी पोहार,बाबा हरणे,विनोद भानुसे,गणेश नागलोत,राजु महेर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पोलिसांनी तब्बल 2 तास अथक परिश्रम करून त्या ट्रकचालकाला कॅबिनमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

अपघात एवढा भीषण होता की CG-07-BR-9747 या ट्रकच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. महामार्ग पोलिसांनी अखेर जेसीबीला पाचारण केले. जेसीबीच्या साह्याने ट्रकची कॅबिन तोडून त्या ट्रकचालकाला बाहेर काढण्यात आले. विनोद चौहान (45,भिल्लाई, छत्तीसगड)असं या ट्रकचालकाचे नाव असून त्याचा जीव वाचविण्यात महामार्ग पोलिसांना यश आलं आहे. असं असलं तरी दुर्दैवाने त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला.

या भीषण अपघातानंतरच्या बचावकार्याचा अंगावर शहारे आणणारा एक्सकलुसिव्ह व्हिडिओ 'News 18 लोकमत'च्या हाती लागला आहे.

अपघातग्रस्त ट्रकमधून चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी केलेली मेहनत या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकीकडे जीव वाचल्याचा आनंद तर दुसरीकडे पाय गमावल्याचं दु:ख ट्रक चालकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

First published: September 19, 2020, 7:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या