जयपूर 22 जानेवारी : राजस्थानची राजधानी जयपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची लाज गेली. 63 नगसेवक असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोर उमेदवार विष्णु लाटा हे विजयी झाले आणि भाजपचे अधिकृत उमेदवार मनोज भारव्दाज यांचा पराभव झाला.
विधानसभा निडणुकीतल्या पराभवानंतर भाजपमधली बंडखोरी आणि लाथाळी अजुन संपली नाही. 91 जागांच्या जयपूर महापालिकेत भाजपचे 63 नगरसेवक आहेत. मात्र बंडखोरीची लागण झाल्याने त्यांना फटका बसला. उपमहापौर मनोज भारव्दाज हे भाजपचे उमेदवार होते. तर लाटा यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आणि ते विजयी झाले.
लाटा यांच्या या विजयामुळे पक्षाला मान खाली घालण्याची वेळ आली आणि पक्षातली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पराभवानंतरही काहीही धडा शिकायला नेते तयार नाहीत असंच बोललं जातंय.
विधानसभा निवडणुकीतही मनमानी आणि बंडखोरीमुळे पक्षाला फटका बसला होता. वसुंधरा राजे यांच्या मनमानी कारभाराला अनेक आमदार कंटाळले होते. मात्र त्यांचं मत कुणीही ऐकून घेतलं नाही असंच चालू राहिलं तर आणखी फटका बसेल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.