पेइचिंग, 24 मार्च : संपूर्ण जग आज कोरोना (Covid - 19) व्हायरसशी सामना करीत आहे. याची सुरुवात चीनमधील (China) वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर आज चीनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
कोरोना विषाणूशी (Coronavirus) सुरू असलेल्या युद्धात सोमवारी चीनमधील युनान प्रांतातील एका व्यक्तीचा हंता विषाणूची (Hantavirus) लागण झाल्याने मृत्यू ओढवला आहे. हा व्यक्ती बसमधून शाडोंग प्रांतातून परतत होता. तो हंता पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर बसमधील इतर 32 प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली आहे. चीनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने या घटनेची माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
संबंधित - कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नी खंबीरपणे पाठीशी, एका दिवसात शिवले तब्बल 500 मास्क
कोरोना विषाणूसारखाच हंता या साथीचा आजार होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. चीनच्या लोकांनी जिवंत प्राणी खाणे बंद केले नाही तर हे कायमच राहील, असं सोशल मीडियावर म्हटले जात आहे. शिवम लिहितात, 'चिनी लोक आता आणखी एक साथीच्या आजाराची तयारी करत आहेत. हा विषाणू उंदीर खाल्ल्याने होतो. सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आपण हा व्हायरस काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे.
हंता व्हायरस म्हणजे काय?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हंता व्हायरस कोरोना इतका घातक नाही. हा आजार उंदीर किंवा खार यांच्या संपर्कात आल्याने पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या म्हणण्यानुसार, 'उंदरांमुळे हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. निरोगी व्यक्ती हंता विषाणूच्या संपर्कात आल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.
हंता विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्याकडे जात नाही. परंतु जर एखाद्याने उंदरांची विष्ठा, मूत्र इत्यादींना स्पर्श केल्यानंतर तो हात डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श केला तर हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यास एखाद्याला ताप, डोकेदुखी, शरीरभर वेदना, पोटदुखी, उलट्या, अतिसार हा त्रास जाणवतो. उपचारास उशीर झाल्यास, संक्रमित व्यक्तीची फुप्फुसे पाण्याने भरली जातात, त्याला श्वास घेण्यास त्रास होतो.
संबंधित - कोरोनाचा कहर: वृद्धांना सोडलं देवाच्या भरवश्यावर, वृद्धाश्रमात सापडले 19 मृतदेह
हंता विषाणू प्राणघातक आहे?
सीडीसीच्या मते, हंता व्हायरस प्राणघातक आहे. संक्रमित लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 38 टक्के आहे. चीनमध्ये हंता विषाणूचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा संपूर्ण जग वुहानपासून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने झगडत आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 16 हजार 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर जगातील 3,82,824 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूच्या व्याप्तीचा अंदाज घेता, हा विषाणू 196 देशांमध्ये पसरला आहे.